पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी

Prime Minister Narendra Modi

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. पंतप्रधान कार्यालयाची समिती गुरुवारी (दि. २८) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. या समितीकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दि. १२ जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या या महोत्सवला खुद्द पंतप्रधान मोदी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे सर्व मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजनाची तयारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार दोन दिवसांमध्ये मंत्री महाजन हे नाशिकमध्ये आढावा घेतील, असे समजते आहे. तत्पूर्वी पंतप्रधान कार्यालयाची समिती ही शहरात येऊन संमेलनाच्या तयारीसंदर्भात माहिती जाणून घेणार आहे.

केंद्रीय समिती नाशिकमध्ये संमेलनाच्या जागा निश्चित करतील. यादरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताफ्याचा मार्ग, हॅलिपॅड, निवासासह अन्य बारीकसारीक बाबींवरही ही समिती काम करणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन हाेईल. तेथून हेलिकॉप्टरने पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात ते येणार असून, तेथून पुढे वाहनाद्वारे सभेच्या ठिकाणी पोहोचतील, अशा पद्धतीने तूर्तास दौऱ्याचे नियोजन असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नाशिकमध्ये होणाऱ्या युवा महोत्सवासाठी १५ हजारांच्या आसपास युवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने केंद्रीय समिती सभेसाठी जागेची निश्चिती करेल. तत्पूर्वी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (दि. २७) तपोवनातील साधुग्राम, निलगिरी बाग आणि मोदी मैदानाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. तसेच पंतप्रधानांसह राज्यातून नाशिकमध्ये येणाऱ्या मंत्री व प्रमुख नेत्यांसाठीचा वाहतूक मार्ग, निवास, सुरक्षा आदींचा आढावा शर्मा यांनी घेतला.

हेही वाचा :

The post पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी appeared first on पुढारी.