पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासकीय यंत्रणेवर ताढ वाढत असल्याने शहरात दोन नव्या प्रशासकीय प्रभागांची निर्मिती करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. अस्तित्वातील सहापैकी पंचवटी व सिडको विभाग क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत मोठे असल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पंचवटी विभागाचे विभाजन करून नांदूर-दसक तर सिडको विभागाचे विभाजन करून पाथर्डी विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

नाशिक महापालिका हद्दीत सद्यस्थितीत नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड हे सहा प्रशासकीय विभाग अस्तित्वात असून, या सहाही विभागांकरीता प्रशासकीय कामाकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या सहाही विभागांच्या कामकाजावर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातून नियंत्रण ठेवले जाते. गेल्या काही वर्षात नाशिक शहराच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील मिळकतींची संख्या साडेपाच लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरविण्यासाठीही प्रशासनावर ताण पडू लागला आहे. विशेषत: पंचवटी व सिडको सारख्या प्रशासकीय प्रभागांचा विस्तार आणि लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाची रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, शिक्षण व आरोग्य व्यवस्था नागरी सुविधा पुरविताना तारांबळ उडत आहे. पंचवटी विभाग आडगाव, नांदूर पर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे आडगाव, नांदूर, औरंगाबाद नाका, विडी कामगार नगर या भागासाठी स्वतंत्र विभागिय कार्यालयाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सिडको विभागातील मुंबई-आग्रा महामार्गाच्या पलिकडे पाथर्डी गावापर्यंत सिडको विभागिय कार्यालयाचा विस्तार आहे. परंतू सेवा-सुविधा पुरविताना दमछाक होते. हा भाग नव्याने विकसित होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी पाथर्डी हा नवीन विभाग स्थापन करण्याचे नियोजन आहे. यात पाथर्डी-वडाळा रोडवरील नव वसाहतींचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सुधारीत आकृतीबंधाच्या मंजुरीनंतर निर्णय

महापालिकेने ९०१६ पदांच्या सुधारीत आकृतीबंधाला नुकतीच मंजुरी दिली आहे. सुधारीत आकृतीबंधाचा प्रस्ताव आता शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येत आहे. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदांच्या बळावर दोन नवीन प्रशासकीय विभागांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग

वर्ष             लोकसंख्या          टक्के

सन १९११       ३०,०९८            ४०.६

सन १९५१      ९७,०४२             ८५.२४

सन १९७१     १,७६,०९१            ३५.१०

सन १९९१      ६,५६,९२५             ५०.३३

सन २००१     १०,७७,२३६            ६३.९८

सन २०११      १४,८६,०५३           ३७.९५

हेही वाचा :

The post पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली appeared first on पुढारी.