पक्ष फोडा, घर फोडा, मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती

संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्याच्या अस्मितेसाठी लढणारे पक्ष व त्यांच्या नेत्यांना नेस्तनाबुत करण्यासाठी आधी पक्ष फोडा, घर फोडा आणि त्यातूनही काही जमले नाही तर चारित्र्यहनन करा, ही रणनिती भाजपने अवलंबिली असून, शरद पवार यांच्याविषयी अजितदादांनी केलेला गौप्यस्फोट ही भाजपचीच स्क्रीट असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या कामकाजासाठी खा. राऊत शनिवारी(दि.२) नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांविषयी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांची लोकं जे बोलताहेत ते सर्व स्क्रीप्टेड आहे. उध्दव ठाकरे आणि शिवसेना, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर भाजपने ही स्क्रीप्ट लिहून दिली. उध्दव ठाकरे यांच्या बाबतीत भाजपने आधी जे केले तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही सुरू आहे. आधी पक्ष फोडला, घर फोडले आणि त्यातूनही हे नेते, पक्ष कोसळत नाही, असे दिसताच त्यांचे चारित्र्यहनन करण्यास सुरूवात केली. मात्र आम्ही याला सामोरे जाऊ आणि पुन्हा उभे राहू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. दादा भुसे सत्तेचा गैरवापर करीत आहेत. त्यांच्यासह सरकारमधील सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावर उभे आहे. भ्रष्ट, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर मार्गाने, खोके मोजून हे सरकार आले आहे. पुरावेही समोर आले असून, कागदोपत्रीही पुरावे देऊ, असेही राऊत म्हणाले.

अब्रुनुकसानीचे दावे आम्हाला नवीन नाहीत

दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी राऊत म्हणाले की, मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे आम्ही फक्त हिशोब मागितला होता. गिरणा मोसम सहकारी कारखाना वाचवण्यासाठी भुसे यांनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रुपये गोळा केले. त्या पैशांचे काय झाले? हे पैसे कोणत्या मनी लॉन्ड्रींग मार्गाने परदेशात की अन्य कुठे गेले? हे विचारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना नाही का? ते विचारल्यावर अब्रु कशी गेली? शेतकऱ्यांनी आंदोलने केली, लोकं रस्त्यावर उतरली म्हणून त्या हजारो लोकांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार का, असा सवाल करत अब्रुनुकसानीचे दावे आम्हाला नवीन नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले.

जरांगे सरकारला धोकेदायक वाटतात

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणाले की सरकार कोणालाही अटक करू शकते. जे सरकारला डोईजड होतात, कायद्याने आवरता येत नाही. त्या व्यक्तींवर सरकार बंधने आणून त्याला अटक केली जाते. आम्हीही त्यासाठीच तुरूंगात गेलो. जरांगे पाटील सरकारला धोकेदायक वाटतात, पण ते त्यांच्या समाजासाठी काम करीत आहेत. त्यांची भाषा प्रखर असली तरी सरकारने त्यांचे एेकले पाहीजे. याचा लोकशाही म्हणतात, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

The post पक्ष फोडा, घर फोडा, मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती appeared first on पुढारी.