पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील मखमलाबाद रोड मळे परिसरात बिबट्याने दर्शन दिले. काश्मिरे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने डरकाळी फोडली. नागरिकांच्या लक्षात आल्यावर सुतळी बॉम्ब तसेच इतर फटाके फोडत बिबट्याला हाकलून लावले. या परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी रहिवासी करू लागले आहे.

सोमवारी (दि.४) संध्याकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या दरम्यान काश्मिरे मळ्यात जाणाऱ्या पायवाटेवरून बिबट्या गव्हाच्या शेतात शिरला. या भागात सुतळी बॉम्ब फोडून बिबट्याला घरापासून लांब पळवून लावण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

मखमलाबाद-म्हसरूळ डावा कालव्याला लागून असलेल्या गंधारवाडी, काश्मिरेमळा, तिडके मळा, काकडमळा या भागात बिबट्याचा संचार वाढू लागला आहे. भटके श्वान, पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्याचे रहिवासी सांगतात.

घटनेची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव यांना कळताच त्यांनी नाशिक वनपरिक्षेत्राचे रात्रपाळीचे गस्तीपथकाला घटनास्थळी रवाना केले. परिसरात बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली. आजूबाजूला असलेले शेती, बांबूच्या झाडांची लपण यामुळे बिबट्या त्या भागात आढळून आला नाही.

The post पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी appeared first on पुढारी.