पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावालाही पाणीपुरवठ्यासाठी सहा योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, या सर्व योजना अयशस्वी झाल्या असून गावात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवू लागल्याने सध्या एका शेतातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावाला सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मात्र, हा पुरवठाही अवघा १५ मिनिटे होत असल्याने पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

नेहमीप्रमाणे उन्हाळा लागला की साक्री तालुक्यातील देवजीपाडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी शोधाशोध, भटकंती सुरू झाली आहे. मिळेल त्या शेतातून बैलगाडीने डोक्यावरून, दुचाकीवरून पाणी आणावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात देवजीपाडाच्या आजूबाजूचे पाण्याचे स्रोत आटतात. गावालगतच्या शेतकऱ्यांना विनंती करून विहिरीवरून गावाची पाण्याची सोय केली जाते. ग्रामपंचायतीची नळयोजनेची विहीर आहे. गणपत पाटील यांच्या शेतात पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र येथील विहिरीचेही पाणी आटले आहे. म्हणून सध्या शशिकांत रामचंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीचे पाणी मिळत असल्याने पाणी ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या विहिरीत टाकले जाते. त्यानंतर पाणी नळयोजनेद्वारे गावाला पुरवले जात आहे. गावात सहा गल्ल्या आहेत. प्रत्येक गल्लीस पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळते. मात्र ते देखील अवघे १५ मिनिटे अशा अल्प कालाधीमुळे पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची भांडीही पुरेशा प्रमाणात भरली जात नाहीत. त्यामुळे गावातील महिला, पुरुषांना भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थ रिक्षातून ड्रम भरून पाणी आणतात. आतापर्यंत देवजीपाडा गावासाठी विविध स्रोतांवरून नळपाणी पुरवठ्याच्या ६ योजना झाल्या. तरी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे होते अशी कैफियत सरपंच संजय बुधा अहिरे आणि माजी पोलिस पाटील डी.पी.पाटील यांनी दै.पुढारीशी बोलताना मांडली. शेतकरी भटू आनंदा यांनी त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी गावास देण्याची तयारी दाखविली आहे.

कोंडाईबारी भागात गुलताऱ्याच्या बाजूला वनविभागाच्या चुनकाबारीत नाल्यास चांगले पाणी आहे. त्या ठिकाणाहून नळपाणी योजना केली तर गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकेल. – डी. पी. पाटील, माजी पोलिस पाटील.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच appeared first on पुढारी.