प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसही सोबत घेत नाही : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर हे कधी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात, तर शिवसेना नेते संजय राऊत आंबेडकर आमचेच नेते असल्याचे सांगतात. प्रकाश आंबेडकर हे कोणाचेच नाहीत, काँग्रेसचे नेतेदेखील त्यांना सोबत घेत नाहीत. आता आंबेडकर हेच त्यांची स्वत:ची काय ती भूमिका घेतील, असा टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंबेडकर यांना पत्रकार परिषदेत लगावला आहे.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी भुजबळ ओबीसींसाठी लढत आहेत. कुणबी आरक्षणाला त्यांचा विरोध नाही तर सरसकट शब्दाला त्यांचा स्पष्ट विरोध आहे. ओबीसींसाठी न्याय मागण्यासाठी तेच सांगत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे त्यांनी सांगितले आहे. आरक्षण देण्यात कुणाचं दुमत नाही. कारण नसताना तणाव होत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. व्यक्तिगत लढण्यासाठी कोणतेही बंधन नसते मात्र, संयम असणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्यातून चुकीचा शब्द जाणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. काही वेळेला परसेप्शन जिंकते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगितले जात असेल तर वातावरण दूषित होणार नाही याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेदेखील ते बोलले.

भुजबळांनी वापरलेल्या झुंडशाही या शब्दाबाबत मंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या देशात झुंडशाहीने कायदे बदलत नाही हे वाक्य बरोबर आहे. पण जरांगे यांच्या मोर्चाबाबत बोलले तर योग्य नाही. ओबीसी आणि मराठे सगळ्यांचे आम्ही मेळावे घेतले. मेळावे घेतले तर भांडण होत नाहीत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. कॅबिनेटमधील माहिती अशी आहे की, सरसकट द्यायच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. परसेप्शन विरुद्ध रिॲलिटी होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. कायद्याला कुणीच बदलू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

इंडिया आघाडीबाबत बोलताना त्यांनी, ‘तुकडे हुए हजार’ अशी इंडिया आघाडीची अवस्था झाली आहे. एक भाऊ, आई आणि बहीण एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी टिकेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. यावेळी शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, अशी घोषणा केली आहे. यावर मंत्री मुनगंटीवार यांनी शांतीगिरी महाराज राजकारणात येत असतील तर चांगली गोष्ट आहे. महाराजांनी राजकारणात यावे आणि राजकारण्यांनी महाराज होऊ नये, इतकीच अपेक्षा असल्याचे सांगितले.

नदीचे शोषण होऊ नये, म्हणूनच गोदाआरती

गेल्या काही महिन्यांत काही साधू माझ्याकडे आले होते. गोदाआरतीबाबत चर्चा झाली होती. संबंधित खाते माझ्याकडे नसले तरी पर्यावरण आणि नदी हा विषय असल्याने मी पैसे द्यायला तयार झालो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यात्मिक आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस या गोष्टींना कधी विरोध करत नाही. गोदाआरतीच्या निधीचे नियोजन व्हावे, गंगाआरती प्रसिद्ध व्हावी, सर्वांचे म्हणणे ऐकले जावे. याबाबतीत संकल्पनेला विरोध नाही. अधिकार अबाधित राहावा, यासाठी पुरोहित संघाचे म्हणणे असल्याचे देखील मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसही सोबत घेत नाही : सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.