प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला

Nashik Leopard Attack www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शौचास गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला चढवला, असे अनपेक्षित संकट ओढवले असतानाही बिथरुन न जाता त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने हल्लेखोर बिबट्यासह जवळच दबा धरुन बसलेल्या दुसऱ्या बिबट्याने ही धूम ठोकली. ही थरकाप उडविणारी घटना पिंपळगाव खांब येथे रविवारी (दि.१०) घडली. अभिषेक सोमनाथ चारसकर असे धाडसी मुलाचे नाव असून, त्याला नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. (Nashik Leopard Attack)

पिंपळगाव खांबच्या मराठी शाळेत चौथीत शिकणाऱ्या अभिषेकचे आई-वडील शेती करतात. त्यांच्या घराशेजारीच बंधारा आहे. तेथे लहानगा अभिषेक रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शौचासाठी गेला होता. तेव्हा अचानक झाडीतून बिबट्या पुढ्यात ठाकला. सावरण्यापूर्वीच त्याने झडप घातली तशी अभिषेकने जोरदार आरडाओरड केली. या झटापडीत बिबट्या गांगरताच अभिषेकने स्वतःची सुटका करून घेत त्याला शौचाचा डबा फेकून मारला. एव्हाना कुटुंबिय आणि आजुबाजुच्या ग्रामस्थांनी धाव घेतली होती. या हालचालींमुळे जवळच दबा धरुन बसलेल्या दुसऱ्या बिबट्यानेही पलायन केले. माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अभिषेकला बिटको रुग्णालयात दाखल केले. जखमा गंभीर स्वरुपाच्या नसल्या तरी खबरदारी म्हणून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. बिबटे नागरिकांवर हल्ले करु लागल्याने वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.  (Nashik Leopard Attack)

बिबट्याची वाढती दहशत (Nashik Leopard Attack)

पिंपळगाव खांबसह दाढेगाव, वडनेरगेट, देवळाली, विहितगाव परिसरात बिबट्यांचे साम्राज्य वाढले आहे. गेल्या महिन्यात वडनेर गेटला एकाचवेळी तीन बिबटे आढळले होते. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात बिबट्याने भरवस्तीत डॉक्टरांचा कुत्रा पळवला होता. जयभवानी रोड येथे बंगल्याच्या आवारात बिबट्या आला होता. 

हेही वाचा :

The post प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.