फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी

दिवाळी खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त घराघरात फराळ तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये गृहिणींची गर्दी दिसून येत आहे. यंदा किराणा साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याने, दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, ग्राहकांचा उत्साह बघता, व्यावसायिकांमध्ये समाधानाचे मात्र वातावरण आहे. (Diwali Nashik)

दिवाळी म्हणजे चकली, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळ्या, लाडू असे अनेक पदार्थ घरोघरी केले जातात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य १५ ते २० टक्‍क्‍यांनी महागले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पूर्वी मोठमोठे डबे भरून घरोघरी फराळ तयार केला जात असे. हा फराळ दिवाळीच्या आधीच गावी नातेवाइकांपर्यंत पोहोचवला जायचा, परंतु आता महागाईमुळे फराळ तयार करणे परवडत नसल्याने आता या प्रमाणात घट होत आहे. मैदा, रवा, साखर, गूळ, पोहे, तेल, खोबरे, बेसन यासह तूप या सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. या सर्व बाबींमध्ये तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

साहित्यांचे दर प्रतिकिलो

सुके खोबरे – १६०

पोहे – ६०

गूळ – ७०

रवा – ५०

तूप- ३७०

साखर – ४२

तेल – १२५

काजू – ८००

बदाम – ७५०

चणाडाळ – ८५

मैदा- ५०

पिठी साखर – ६०

शेगदाणा – १३५

बेसन – १०५

रेडिमेड फराळाला मागणी

बाजारात रेडिमेड फराळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यास ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. बहुतांश किराणा दुकानदारांकडूनच रेडिमेड फराळ जागेवर तयार करून दिला जात आहे. किराणा साहित्य घेतल्यानंतर फराळ तयार करण्याची नवी पद्धत यानिमित्त बघावयास मिळत आहे. यासाठी किराणा दुकानाबाहेरच करागिरांच्या हातून फराळ साहित्य तयार करून दिले जाते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या साहित्यात वाढ झाली आहे. मात्र, ग्राहकांचा उत्साह समाधानकारक आहे. जे ग्राहक किराणा साहित्याची यादी सोडून जातात, त्यांना घरपोच किराणा पोहोचवला जातो. याचे कुठलेही पैसे आकारले जात नाहीत.

– पंकज साळी, किराणा दुकान चालक

 

महागाई असली तरी, दिवाळी सणाचा आनंद वेगळा असतो. कुटुंबात लहान मुले असल्याने, त्यांच्यासाठी फराळाचे साहित्य तयार करावेच लागतात. महागाईमुळे मोजकेच साहित्य खरेदीला प्राधान्य दिले आहे.

– संगीता वाकचौरे, गृहिणी

हेही वाचा :

The post फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी appeared first on पुढारी.