बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना

police

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर भिलाटीत हळदीच्या कार्यक्रमात रात्री दहानंतर बँड वाजविला जात असल्याने पोलिसांनी घटनास्थळी जावून संबंधितांना बँड बंद करण्यास सांगितले. मात्र यावेळी पोलिसांचे न ऐकता त्यांना धक्काबुक्की करीत, त्यांच्यावर दगडफेक करून जखमी करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत वाद्य वाजविले जात असल्याने ही कारवाई करण्यात येत होती. याप्रकरणी साक्री पोलिसात फिर्याद दिल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी, की इंदिरानगर भिलाटीत न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत वाद्य वाजविले जात होते. त्यामुळे गस्तीवरील पोलीस चेतन रमेश आढारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत बँड बंद करण्यास सांगितले. यावेळी गोटु गिरधर ठाकरे (रा.इंदिरा नगर,भिलाटी), धनराज सोनु भवरे (रा.अष्टाणे मळगाव,ता.साक्री) यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. शिवाय पोलिसांना धक्काबुक्की करीत दगडफेकही करण्यात आली. यामध्ये पो. कॉ. चेतन आढारे जखमी झाले. दरम्यान धुळे ग्रामीणचे डिवायएसपी प्रदीप मैराळे, सपोनि हनुमंत गायकवाड, पीएसआय बी. बी. नन्हे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. पो. कॉ. चेतन आढारे यांच्या फिर्यादीवरून गोटु ठाकरे, धनराज भवरे याच्यासह मायकल म्युझिकल बँडचा चालक अशा तिघांवर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

The post बँड बंद करण्यास सांगितल्याने साक्री पोलिसांवर हल्ला; हळदीच्या कार्यक्रमातील घटना appeared first on पुढारी.