बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती

सुधाकर बडगुजर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतचे कथित पार्टी प्रकरण आणि नगरसेवक असूनही बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीसोबत केलेल्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केल्यामुळे अडचणीत आलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी चौकशीला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बडगुजर यांनी स्थायी समितीतील २००७ ते २००९ या कालावधीतील ठरावांच्या प्रतीची माहिती मागवली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिल्याचे वृत्त आहे.

राज्यातील सत्तांतर आणि पक्ष फोडाफोडीचे राजकारण आता वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. बडगुजर हे जवळपास तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून गेले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासारखे महत्त्वाचे पदही त्यांनी भूषवले आहे. कागदोपत्री पक्के अशी त्यांची ओळखही आहे. असे असताना बडगुजर यांच्यावर, नगरसेवक असताना स्वत:च्या कंपनीला कामे मिळवून दिल्याचा ठपका ठेवला गेला आहे. बडगुजर यांनी मात्र नगरसेवक झाल्यानंतर कंपनीवरील पदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. या सर्व वादात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उडी घेत बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीच्या कामकाजाची माहिती मागवली आहे. सोबतच, बडगुजर यांच्या कार्यकाळात स्थायी समिती, महासभेवर बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीला मिळालेली कामे, त्यासाठी झालेले ठराव, बिल अदा करण्यापासून तर अन्य प्रकरणातील ठरावांची माहिती गोळा केली जात आहे. हे करीत असतानाच बडगुजर यांनीही २००७ ते २००९ या कालावधीत स्थायी समितीवर झालेल्या ठरावाची माहिती मागितल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा :

The post बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती appeared first on पुढारी.