नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम

निफाड थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मागील तीन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी (दि. २२) शहरातील तापमानात वाढ होत पारा १६.३ अंशांवर स्थिरावला. पण हवेतील गारवा कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. (Nashik Cold News)

उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरी व दक्षिण भारतातील अवकाळी पावसाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. अचानक हवेतील गारव्यात वाढ झाल्याने सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामानाबरोबरच हवेत गारठा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांनी दिवसभर उबदार कपडे परिधान केले होते. तसेच थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम आहे. मालेगावचा पारा १५.८ अंशांवर स्थिरावला असून, शहर व परिसरात वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मालेगाववासीय गारठून गेले आहेत. याशिवाय निफाडमध्ये १४.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात पहाटेच्या वेळी पडणारे दवबिंदू व कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकरी बागांमध्ये धूरफवारणी करत आहेत. थंडीमुळे अन्य तालुक्यांमधील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मध्य भारतातील वातावरण काेरडे असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना कोणताच अडथळा नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये नाशिकसह राज्यभरात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम appeared first on पुढारी.