भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात

उद्धव ठाकरे,www.pudhari.news

पुढारी ऑनलाइन डेस्क; 22 जानेवारीला अयोध्येत न जाता आपण नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. त्यानुसार त्यांनी आज सहकुटुंब काळारामाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

तब्बल २८ वर्षांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि.२३) नाशिकमध्ये होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज (दि.२२) सहकुटुंब नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते येथील श्री काळाराम मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली.  उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.

बाळासाहेबांची आठवण करुन देणारी वेशभूषा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी परिधान केलेली भगवी वस्र व गळ्यात घातलेल्या रुद्राक्षाच्या माळा लक्षवेधी ठरल्या. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्याचे पाहायला मिळाले. त्यानिमित्ताने हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वेशभूषा असल्याचे बाळासाहेबांची आठवण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.  काळारामाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरती देखील केली जाणार आहे.

28 वर्षांनंतर नाशिकमध्ये अधिवेशन 

मंगळवारी, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाच्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राज्यभरातून सुमारे १७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती खा. राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

The post भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात appeared first on पुढारी.