भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

ना. रामदास आठवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीसोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. परंतु, पवार यांच्या येण्याने आमचे मंत्रिपद लांबल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रिपाइं (आठवले गट) ला मंत्री पदासंदर्भात दिलेला शब्द पाळावा, अशी आठवण यानिमित्ताने त्यांनी भाजपला करून दिली.

नाशिक दाैऱ्यावर असलेल्या ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने करताना रिपाइंला सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यासंदर्भात ४ ते ५ वेळेस चर्चा झाली असून त्यांनी शब्द दिला आहे. यावेळी ‘आमची चांगली झालीय शिक्षा, म्हणून आम्ही करतोय प्रतीक्षा’ अशी कविता त्यांनी सादर केली.

रिपाइंच्या विविध पक्षांमधील ऐक्याबाबत बोलताना, या सर्व गटांमध्ये आपल्या पक्षाचा गट प्रबळ असल्याचा दावा ना. आठवले यांनी केला. वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासोबत आल्यास देशात दलित बांधवांची ताकद वाढेल, असा विश्वासही ना. आठवले यांनी व्यक्त केला. समान नागरी कायदा व्हावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती, असे सांगताना या कायद्याला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी, तर विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांची राज्य कार्यकारिणीत नेमणुकीची घोषणा ना. आठवले यांनी केली.

आमच्यासोबत आले दादा

शिवसेनेतील फुटीनंतर ना. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप केला होता, याकडे ना. आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर ‘आमच्याकडे आहेत डोके, त्यामुळे देऊ शकत नाही खोके’ अशी मिश्कील टिप्पणी केली. तसेच ज्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी केला होता वादा आणि आमच्यासोबत आले अजितदादा अशा शब्दांत ना. आठवले यांनी पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

आमच्यासोबत भुजबळ

खा. शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री, मंत्री, गृहमंत्री तसेच विविध पदे दिली. पण नाइलाजास्तव भुजबळ यांना आमच्यासोबत यावे लागले, असा दावा ना. आठवले यांनी केला. ते ओबीसी नेते असून, त्यांना चांगला जनाधार आहे, असे सांगताना आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत ‘जर आमची काढली कुणी कळ, आमच्यासोबत आहेत छगन भुजबळ’ असे टीकाकारांना उत्तर दिले.

हेही वाचा : 

The post भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले appeared first on पुढारी.