भास्कर वाघची मालमत्ता सरकार जमा

धुळे जिल्हा परिषद www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवाराज्यात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद अपहार कांडातील प्रमुख आरोपी तथाकथित धर्मभास्कर तथा भास्कर वाघ याच्या बंगल्यासह आठ मालमत्ता सरकार जमा करण्याचा आदेश गृह विभागाने दिला आहे. यात भास्कर वाघ यांच्या नावे असलेल्या तीन, तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या पाच मालमत्तांचा समावेश आहे. भास्कर वाघ सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामध्ये मोठा घोटाळा झाला होता. सन १९९० ते ९३ या काळामध्ये धनादेशावरील रकमेमध्ये फेरफार करून लाखो रुपये लाटले गेले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी केलेल्या चौकशीत राज्याला हादरवणारे हे भ्रष्टाचाराचे कांड उजेडात आले. यानंतर रोखपाल भास्कर शंकर वाघ यांच्यासह जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात अपसंपदेसह भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते. या खटल्याचे कामकाज चालवण्यासाठी विशेष न्यायालयाचे गठनदेखील झाले. या गुन्ह्यात भास्कर वाघ याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तर मंगला वाघ यांनादेखील एका गुन्ह्यात शिक्षा झाली. भास्कर व मंगला वाघ यांना १० मार्च २००६ रोजी धुळे न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. न्यायालयाने हा निकाल कायम ठेवल्यामुळे सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०१८ मध्ये ती निकाली निघाली. यानंतर मालमत्ता सरकार जमा करण्यास सुरुवात झाली.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीवास्तव यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला होता. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक दत्तात्रय चौधरी यांनी चौकशी करून अपहार व अपसंपदेचा प्रकार समोर आणला. त्यासाठी चौधरी यांनी जुलै १९७३ ते ऑगस्ट १९८९ या काळातील भास्कर वाघच्या संपत्तीचा हिशेबदेखील केला होता. त्याआधारे विशेष सरकारी वकील संभाजी देवकर यांनी खटल्यात प्रभावी बाजू मांडली होती.

या मालमत्तावर टाच

१९९० च्या दशकात राज्यभर गाजलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी भास्कर वाघ याच्या आठ मालमत्तांवर शासनाने टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता सरकार जमा कराव्यात, असा आदेश गृहविभागाने दिला आहे. यामध्ये वाडीभोकर रोडवरील सुमारे २५०८ चौ.मी. वरील त्याचा तीनमजली प्रभाम बंगला याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सन १९९० मध्ये अपहार-अपसंपदा समोर येण्याच्या तीन वर्षांपूर्वी ३१ मार्च १९८६ रोजी मंगला भास्कर वाघ यांच्या नावे ही मालमत्ता केली होती. तिची किंमत त्यावेळी तीन लाख ४० हजार रुपये आकारण्यात आली होती. याशिवाय भास्कर वाघच्या नावे असलेला क्षिरे कॉलनी परिसरातील बांधकामसह असलेला प्लॉट, शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे व दराणे येथील शेती, दोनमजली इमारत धुळे शहरातील सर्वे नं. २२३/१-३ तसेच सर्वे नं. ४९/१ येथील बखळ जागेवरील सुमारे ५ हजार चौ.फू. प्लॉट याचाही समावेश आहे. हे दोन्ही प्लॉट सन १९८८ मध्ये नावे करण्यात आले होते. शिवाय ते भास्कर वाघ यांच्या नावे आहे.

गृहविभागाच्या आदेशानुसार या मालमत्ता शासनाच्या नावे होतील. सध्या या मालमत्ता वाघ कुटुंबीयांकडे आहेत. आदेशानुसार या मालमत्ता सोडण्याबद्दल वाघ कुटुंबीयांना नोटीस दिली जाऊ शकते. त्यानंतर मालमत्तांबाबत शासन निर्णय घेऊन दिशा ठरेल.

हेही वाचा –

The post भास्कर वाघची मालमत्ता सरकार जमा appeared first on पुढारी.