सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

सलीम कुत्ता नाशिक कनेक्शन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याची १९९८ साली हत्या झाल्याचा दावा काँग्रेसच्या एका आमदारांनी नागपूरमध्ये विधानसभेबाहेरील पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली. मात्र, सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत असून तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असल्याची अधिकृत माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या ‘व्हिडिओ’ प्रकरणात आरोपी सलीम याच्या चौकशीकरीता येरवडा कारागृहाशी पत्रव्यवहार केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बडगुजर यांनी दाऊदचा हस्तक व दहशतवादी सलीम कुत्ता याच्यासमवेत पार्टी केल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवल्यानंतर बडगुजर यांची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान, सोमवारी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याचा खून झाल्याचा दावा केला. त्यामुळे या घटनेवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र शहर पोलिसांनी सलीम कुत्ता हा जिवंत असल्याचे सांगितले आहे. तसेच बडगुजर यांच्या व्हिडिओ प्रकरणी त्याची देखील चौकशी करणार असल्याचे सांगितले.

“तो’ सलीम कुत्ता नव्हे तर कुर्ला

काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. मुंबईमध्ये सन १९९८ मध्ये रुग्णालयात मृत्यू झालेल्याचे नाव सलीम कुर्ला असे होते. सलीम कुत्ता याचे नाव मोहम्मद सलीम मीरा शेख असे असून, तो सन २०१६ मध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. त्यास पॅरोल मिळाला होता. मात्र पॅरोलवरील आरोपी पुन्हा येत नसल्याने गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना पॅरोल न देता पुणे येथील येरवडा कारागृहात नेण्यात आले आहे.

कारागृहाकडे चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे सन २०१६ मध्ये एका प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होते. त्यावेळी सलीम कुत्ता हादेखील तिथे होता. तेव्हा दोघांचा परिचय झाल्याचा दावा होत आहे. त्यानुसार तत्कालीन नोंदीनुसार सलीम कुत्ता व बडगुजर यांचे बॅरेक स्वतंत्र होते का, दोघे नेमके कोणत्या ठिकाणी होते, त्यांच्यात संपर्क होईल अशी परिस्थिती होती का? याबाबत नाशिक पोलिसांनी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे माहिती मागितली.

हेही वाचा :

The post सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती appeared first on पुढारी.