मंत्री ना. गिरीश महाजन : “नाथाभाऊ तुम्ही ‘ती’ कबड्डी खेळलेत, ‘ही’ नाही !”

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

“सध्या मी काहीही म्हटले तरी नाथाभाऊंना ते आपल्यालाच बोलले असे लागते. मी कबड्डी खेळल्याबद्दल बोललो तर ते लागलीच आपण अंपायर असल्याचे म्हणाले. आता त्यांनी राजकीय कबड्डी खेळली असली तरी प्रत्यक्ष कबड्डी खेळलेले नाही !” अशा शब्दांमध्ये ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना टोला लगावला.

जिल्हा दूध संघाच्या मेळाव्यानिमित्त मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी, दि.5 मुक्ताईनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांना टोला लगावला. तसेच खडसे यांना तुमची ताकद असेल तर निवडून येऊन दाखवाच असे आव्हानही दिले. यावेळी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. खडसे यांच्या विरोधात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारीच जाहीर केली. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्ला करत म्हणाले, भाजपमध्ये असताना तुम्ही म्हणायचे सर्व मीच केले. भाजप मी वाढवला. मात्र, आता तुम्ही पक्ष बदलला आहे. आता निवडून येऊन दाखवाच, असे आव्हानही गिरीश महाजन यांनी दिले.

सर्व पदं घरातच ठेवली…

खडसे म्हणतात “आमदारकी मलाच पाहिजे, खासदारकीही मलाच पाहिजे. जिल्हा बँक मलाच पाहिजे, दूध संघ मलाच पाहिजे, ग्रामपंचायत मलाच पाहिजे. सर्व घरात पाहिजे. पक्ष सोडल्यावर काय होते,  हे तुम्हाला आता कळेल. सर्व पद भोगायचे आणि नंतर म्हणायचे पक्षाने मला काय दिलं?” असा संतप्त सवालही मंत्री महाजन यांनी केला.

त्या कबड्डीचा मी अंपायर- खडसे

“गिरीश भाऊ जी कबड्डी शिकले, त्या कबड्डीचा मी अंपायर” असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. कबड्डी खेळत असताना कोणाची टांग कशी खेचायची हे गिरीश महाजन उत्तमरित्या शिकले. मात्र त्यांना जी कबड्डी शिकवण्यात आली, त्या कबड्डीचा मी अंपायर राहिलेलो आहे. त्यामुळे जोपर्यंत मी  अंगुलीनिर्देश करणार नाही तोपर्यंत समोरचा आऊट आहे, की जिंकला याचा निर्णयच होत नव्हता. शेवटी अंपायर तो अंपायर असतो आणि खेळाडू तो खेळाडूच असतो”. असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी महाजन यांना लगावला.

हेही वाचा:

The post मंत्री ना. गिरीश महाजन : "नाथाभाऊ तुम्ही 'ती' कबड्डी खेळलेत, 'ही' नाही !" appeared first on पुढारी.