मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आमिष दाखवून महंतास चाळीस लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तिघा संशयितांनी संगनमत करून पंचवटीतील गोरेराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आमिष दाखवून तसेच वेगवेगळ्या कारणांनी पैसे उसने घेत महंतास ४० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित राजू अण्णा चौघुले, रोहन चौघुले (दोघे रा. अशोकनगर, सातपूर) व भारती युवराज शर्मा (रा. स्वामीनारायण मंदिराजवळ) यांच्याविरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंत राजारामदास गुरू श्री शालिग्रामदास वैष्णव यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीत ४० लाख रुपयांना गंडा घातला. महंत राजारामदास व चौघुले यांची ओळख असल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले. चौघुले याने घेतलेले पैसे परत केल्याने ऑगस्ट २०२१ मध्ये महंतांनी चौघुलेस १० लाख रुपये दिले. त्यानंतर कामासाठी २५ लाख रुपयांची मागणी केल्याने महंतांनी ते पैसे दिले. तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून देतो, असेही संशयितांनी सांगितले. मात्र ठरल्याप्रमाणे काम केले नाही. तसेच चौघुले यांनी पैसे परत केले नाही. त्यानंतर संशयितांनी महंतांची कार गहाण ठेवत पाच लाख रुपये घेतले. दरम्यान, चौघुले यांनी महंतांना दिलेला धनादेश बँकेत वटला नाही, मात्र चौघुले यांनी महंताविरोधात पोलिसांकडे धनादेशाचा गैरवापर केल्याची तक्रार दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महंतांनी तिघांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आमिष दाखवून महंतास चाळीस लाखांना गंडा appeared first on पुढारी.