महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रव्यवहार करत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार महापालिका प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना पत्राद्वारे मनुष्यबळाच्या उपलब्धतेविषयी अहवाल मागविला आहे. यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार हे आता पुरते स्पष्ट झाले आहे.

नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांची पंचवार्षिक मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा वाद आणि प्रभागरचनेचे न्यायप्रविष्ट प्रकरण यामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. प्रभागरचनेच्या वादावर येत्या १७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. मतदारयादीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनामधून निवडणूक आयोगाने १ जुलै २०२३ ही तारीख कट ऑफ लिस्ट गृहीत धरून मतदारयादी अंतिम करण्याचे निर्देश दिल्याने महापालिका निवडणुकांचा बिगुल दिवाळीत वाजेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, न्यायालयीन वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. त्यामुळे नव्या वर्षात निवडणुका घेण्यात येतील, असे चित्र राजकीय गोटातून व्यक्त होत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र पाठवत मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी माहिती मागविली आहे.

२५ आॅक्टोबरचा ‘अल्टिमेटम’

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र पाठवत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी व अन्य पूरक माहिती मागवली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत ही माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सर्व विभागांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

मतदारयादीसाठी नव्याने ‘कट आॅफ डेट?’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी मतदारयाद्या तयार करण्यासाठी १ जुलै २०२३ ही ‘कट ऑफ डेट’ निश्चित करण्याबाबतची अधिसूचना काढली गेली. मात्र, या कालावधीत कोणत्याही निवडणुका न झाल्यामुळे आता मतदारयाद्यांसाठी नव्याने कट ऑफ डेट निश्चित करावी लागणार आहे.

हेही वाचा :

The post महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच appeared first on पुढारी.