महावितरणच्या पाथर्डी विभागाला तक्रारनोंद पुस्तिका भेट

महावितरण - पाथर्डी

नाशिक (इंदिरानगर) : पुढारी वृत्तसेवा
महावितरण कंपनीतील पाथर्डी विभागात गेल्या २० वर्षांपासून तक्रार नंबरच प्राप्त झाला नसल्याने ग्राहकांची तारांबळ उडत होती. ही बाब लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता यांच्याकडे मांडताच पाथर्डी विभागात २४ तास कार्यरत असणारा तक्रार क्रमांक मिळाला. त्याबाबत परिसरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक व ग्राहकांनी मुख्य अभियंता यांचे पत्राद्वारे आभार मानले. तसेच सहायक अभियंता यांना तक्रारनोंद पुस्तिका भेट देण्यात आली.

महावितरण कंपनीच्या पाथर्डी विभागात विजेच्या समस्या मांडण्यासाठी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी २४ तास तक्रार क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार क्रमांकाच्या मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), भाजप, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजसेवक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. या रास्त मागणीचा सकारात्मक विचार मुख्य अभियंता यांनी केल्याने पाथर्डी गाव, वडनेर गाव ते विल्होळी, रायगडनगर या परिसरातील ३४ हजार ग्राहकांना लाभ होणार आहे. माजी नगरसेवक सुदाम डेमसे, संजय नवले व सर्वपक्षीय पदाधिकारी त्र्यंबक कोंबडे, मदन ढेमसे, सुनील कोथमिरे, तानाजी गवळी, खंडू पाटील धोंगडे, संजय जाचक, दत्ता ढेमसे, धनंजय गवळी, विकी कांडेकर, प्रमोद गवळी, गणेश चौधरी, मनोज गोवर्धने, जितेंद्र चोरडिया, सुदाम जाचक, दर्शन लढ्ढा यांनी पाथर्डी कक्षप्रमुख सतीश मेहेर यांना तक्रारनोंद पुस्तिका भेट दिली.

७८७५७६०६७८ हा २४ तास कार्यरत असणारा तक्रार क्रमांक असून, मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवा पुरवण्यासाठी व तक्रार तत्काळ सोडवण्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा कटिबद्ध आहे. – सतीश मेहेर, सहायक अभियंता पाथर्डी विभाग

परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी व विभागाचा विकास करून सुख-सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आमचा व आमच्या सहकाऱ्यांचा नेहमीच प्रयत्न राहील. महावितरणबाबत असलेल्या विविध समस्यांवर अधिकारीवर्गाशी चर्चा करून आम्ही तोडगा काढत आहोत. त्याचे परिणाम म्हणूनच २० वर्षांनंतर तक्रार क्रमांक मिळाला आहे. – सुदाम डेमसे व संजय नवले , माजी नगरसेवक

हेही वाचा:

The post महावितरणच्या पाथर्डी विभागाला तक्रारनोंद पुस्तिका भेट appeared first on पुढारी.