राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने कसे होणार आमदार, नगरसेवक असा प्रश्न उपस्थितांना पडला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साजऱ्या केल्या गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही?, महायुती, महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबतची भूमिका?, नाशिक लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण? आदी प्रश्नांची उकल राज ठाकरे यांच्याकडून केली जाईल, अशी अपेक्षा राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, त्यांनी आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात अखेरीस ‘निवडणुकांचे निर्णय घेऊच’ एवढाच उल्लेख केल्याने लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याशिवाय राज्यातील राजकारणाचाही सस्पेन्स वाढल्याने, राज यांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुूकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपाटले आहेत. मनसे नाशिकमधून निवडणुकीचा बिगुल फुंकणार अशी शक्यता होती. राज यांनी श्रीकाळारामाची महाआरती करून त्याबाबतचे संकेतही दिले होते. मात्र, त्यांनी सभेत पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत सर्वच पत्ते गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले.

यावेळी त्यांनी पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला देताना भाजपचे उदाहरण दिले. २०१४ पासून भाजपला जे यश मिळाले, ते लगेच नाही. त्यांचा पक्ष १९५२ मध्ये सुरू झाला. नरेंद्र मोदींचे यश तुम्हाला वाटत असेल, पण त्यांचे २० टक्केच यश असेल. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या, हे त्यांचे यश आहे. अचानक आलेले यश नाही. अटलजी यांचे सरकार १३ दिवस, नंतरचे १३ महिने व त्यानंतर साडेचार वर्षेच सरकार आले. त्यानंतर आता मोदींचे सरकार आले आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो, आगामी काळात पेशन्स ठेवा, यश मी नक्की मिळवून देणार. मात्र, हे करीत असताना त्यांनी निवडणुकीतील डावपेचांबाबत कुठलीही वाच्यता केली नाही. त्यामुळे यश नेमके कसे मिळणार? हा जरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असला, तरी ‘पेशन्स’ ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही.

सोशल मीडिया प्रभावी वापरा
सोशल मीडियावर माझ्या बाबतीत काहीतरीच दाखवतात. गाडी येते… मी उतरतो आणि रारारा गाणे लावतात. असे रील्स लोक बघत नाहीत. काहीतरी माहिती असेल, तरच बघतात. सोशल मीडिया तज्ज्ञ केतन जोशी यांनी जी माहिती सांगितली, ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची व्याख्याने जिल्हा, तालुका स्तरावर ठेवणार आहेत. सोशल मीडियाचा वापर प्रभावी करा. लोकांना त्यातून माहिती मिळाली पाहिजे, फक्त दणदणीत संगीत, रुबाबदार चाल वगैरेने फक्त मनोरंजन होईल, असाही सल्ला राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.