राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पक्षस्थापनेपासून चढ कमी आणि उतार अधिक आलेत. पण तुम्ही सोबत राहिलात, ही माझ्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे भावनिक आवाहन केले. संयम ठेवण्यातून यशप्राप्ती निश्चितच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. ९) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. गेल्या काही निवडणुकांत पक्षाला मिळत निवडणुकांत पक्षाला मिळत असलेल्या जेमतेम यशाबद्दल बोलताना त्यांनी भाजपचे उदाहरण दिले. सत्तेची पहाट उगवायला भाजपला साडेचार दशकांचा, तर स्वबळावर सत्ता मिळवायला सहा दशकांचा कालावधी लागला. वाजपेयी – अडवानी यांच्यापासून महाजन – मुंडे यांच्यापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी खस्ता खाल्ल्यात आणि आज त्याची फळे भाजप चाखतो आहे. चढ उताराच्या या प्रवासातूनच भाजप आज मजबूत बनला आहे. ही बाब लक्षात घेता, मनसेने १८ वर्षांच्या अस्तित्वात मारलेली मजल समाधानकारक आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी थोडा संयम ठेवावा, निवडणुकांत यश मिळवून देण्याचा मी शब्द देतो, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

कडेवर स्वतःची पोरं खेळवायची

सध्या दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवण्याची नवी पद्धत सुरू झालीय. मला मात्र स्वतःचीच पोरं कडेवर खेळवायची आहेत. ही ताकद माझ्यात आहे. त्यासाठीच संयमी वृत्तीने वाटचाल करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.

The post राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला appeared first on पुढारी.