महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

घराला आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महिलेस घरात कोंडून घराला बाहेरून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. निखील उर्फ स्वप्निल बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

जेल रोड येथील पिंपळपट्टी परिसरातील रहिवासी कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी (दि.१९) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जाळपोळ केली. तक्रार केल्याचा राग मनात ठेवून निखीलने कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कल्याणी यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिस ठाण्यात निखीलविरोधात गुन्हा दाखल आहे.

घटना घडल्यानंतर संशयित फरार होता. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित निखील पुणे येथील हिंजवडी येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, हवालदार महेश साळुंके, नाईक परदेशी, अंमलदार राहुल पालखेडे, चालक समाधान पवार यांचे पथक पुणे येथे गेले. त्यांनी सापळा रचून निखिलला ताब्यात घेतले. त्याचा ताबा नाशिकरोड पोलिसांना देण्यात आला आहे.

हेही वाचा –