मार्च एन्डींगलाही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार

नाशिक महानगरपालिका pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्च महिना संपण्यास आता जेमतेम चार दिवसांचा कालावधी राहिला असून, या चार दिवसांत तब्बल १६ कोटी रुपयांची घरपट्टी तसेच २५ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेसमोर आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सुटीच्या दिवशीही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरपट्टी, पाणीपट्टी, विविध करांची शंभर टक्के वसुली होणे आवश्यक आहे. महसूलवृद्धी न झाल्यास वित्त आयोगाचे अनुदान रोखण्याचा इशारा शासनाने दिला आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारक, थकबाकीदारांनी चालू आर्थिक वर्षाच्या शिल्लक चार दिवसांत मागणीची रक्कम व थकबाकी भरणे गरजेचे आहे. करभरणा करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे.

शहरातील ज्या मिळकतधारकांनी वाढीव बांधकामे केली आहेत किंवा वापरात बदल केले किंवा टेरेसचा अनधिकृत वापर केला, अशा मिळकतधारकांनी स्वतःहून महापालिकेला कळवून मालमत्ता कर लागू करून घ्यावा अन्यथा अनधिकृत गैरवापर करणाऱ्या मिळकतींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

एप्रिलपासून जप्ती
मार्चअखेरपर्यंत जे थकबाकीदार आपल्याकडील कराच्या थकीत रकमेचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यांची चलत व स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या नळ कनेक्शनधारकांनी त्यांची थकबाकी अद्यापपर्यंत भरली नाही, त्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

शहरातील मिळकतधारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यावसायिक गाळे आदींची थकबाकी त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावे. ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीदेखील भरणा स्वीकारला जाणार आहे. – डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

हेही वाचा:

The post मार्च एन्डींगलाही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार appeared first on पुढारी.