नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

इगतपुरी : वाल्मीक गवांदे
तालुक्यात अनेक छोटी – मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की, हाच का धरणांचा तालुका, असा प्रश्न उपस्थित होतो.

सकाळपासून पाण्यासाठी खडकवाडी भागातील महिला, पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट सुरू होते. शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगरदर्‍या, जंगल खोर्‍यातून पाण्यासाठी पायपीट करत असताना जंगली श्वापदांचीही भीती असते. मात्र, पाण्यासाठी जिवावर उदार होऊन सहा ते सात किलोमीटर रणरणत्या आग ओकणार्‍या उन्हातून एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जनावरेही पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे.

शिक्षण घेण्याच्या वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागते, यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल, हे सांगायला नको. पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येते. जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही, तर येत्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा देण्यात येत आहे.

खडकवाडी : येथील महिला हंडाभर पाण्यासाठी भर तीव्र उन्हात चार किलोमीटरपर्यंत भटकंती करत आहेत.

टाकी बांधली, घरात नळ दिले मात्र पाणीच नाही
केंद्र शासनाची ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेचा किती प्रमाणात फायदा झाला, हे विचारायलाच नको. टाकी बांधली, घरात नळ दिले, मात्र पाणीच नाही. जलजीवन मिशनसारख्या योजनांचा बोजवारा उडाला असून, सर्वत्र अपूर्ण कामे झालेली आहेत. लोकप्रतिनिधी यांना शक्तिप्रदर्शन करायला वेळ आहे. मात्र आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

एकीकडे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी डोळ्यात पाणी आलेल्या या मतदार राजाकडे ढुंकूनही बघायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. निवडणुका येतात – जातात. मात्र आदिवासी बांधवांची डोळ्यात पाणी येऊन घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधींना कधी दिसणार, हा माझा प्रश्न आहे. – लकी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, आदिवासी काँग्रेस.

हेही वाचा:

The post नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय appeared first on पुढारी.