मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

मुंढेगाव www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी): पुढारी वृत्तसेवा

कोव्हिड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे चित्र समोर आले. यामध्ये वीटभट्टी, ऊसतोड, खाणकाम, शेतमजुरी अशा विविध कारणांमुळे स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या शाळाबाह्य बालकांची माहिती मिळवण्यासाठी व अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात “मिशन झीरो ड्रॉपआउट” सुरू करण्यात आले आहे.

या मिशन अंतर्गत गाव-परिसरात सर्वेक्षण करीत असतांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव शाळेत कार्यरत शिक्षक अनिल बागुल व नरेंद्र सोनवणे यांना मुंढेगाव शिवारात असलेल्या वीटभट्टीवर ‘सहा’ शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. सुरुवातीला पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दर्शविला. त्यामुळे शिक्षकांनी थेट प्रत्यक्ष वीट भट्टीवरच जाऊन अध्यापनाचे वर्ग घेतले. मुलांना येथेच शिक्षणाचे धडे दिले. मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पालक व विद्यार्थी यांचे समुपदेशन करून शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे इगतपुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विद्यार्थ्यांना “शिक्षण हमी पत्रक” भरून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. बीटविस्तारअधिकारी राजेंद्र नेरे व मुख्याध्यापक भगवंत पाटील यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश ,लेखन साहित्य, पुस्तके देऊन स्वागत केले. स्थलांतरित विद्यार्थ्यांमध्ये रत्ना भिल, दिपाली भिल, बादल भिल ,अविनाश भिल, सोमनाथ भिल,सुनील भिल या विद्यार्थ्यांचा समावेश असून सर्व विद्यार्थी आडगाव ता.चोपडा जि. जळगाव येथील रहिवासी असून ते आपल्या पालकांसोबत वीटभट्टीवर आलेले आहेत. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रेखा शेवाळे, अनिल बागुल, नरेंद्र सोनवणे, सरला बच्छाव,मालती धामणे, विमल कुमावत ,ज्योती ठाकरे ,सुनंदा कंखर, हेमलता शेळके, भगवान देशमुख ,राजकुमार रमणे हे सर्व शिक्षक मार्गदर्शन करत आहे.स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांना मोफत शिक्षणासोबत शालेय पोषण आहाराचा देखील लाभ देण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात appeared first on पुढारी.