रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ स्थळावर उपाययोजना, ३३३ स्पीडब्रेकर्स

black spot pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर मार्गावर झालेल्या बस अपघाताला आता तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवरील अपघातप्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी ३३३ स्पीडब्रेकर्स तसेच सूचनाफलक, थर्मोप्लास्टिक व्हाईट पेंट आणि कॅट आइजसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Black Spot pudhari.news

८ ऑक्टोबर २०२२ रोजी संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरचीलगतच्या चौकात पहाटेच्या सुमारास झालेल्या बस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची तातडीने पाहणी करत मिरची चौकासह शहरातील सर्वच ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महापालिकेने पोलिस, वाहतूक शाखेसमवेत २६ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्वेक्षण अहवालाअंती शहरातील प्रमुख रस्त्यांवर ३३३ ठिकाणी स्पीडब्रेकर्स, धोक्याचा इशारा देणारे सूचनाफलक, झेब्रा क्रॉसिंग, थर्मोप्लास्टिक पेंट, कॅट आइज यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यासाठीची निविदाप्रक्रिया वर्षभर लांबली. प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतरही कामाच्या दर्जाविषयी प्रश्न कायम राहिले. विशेषत: स्पीडब्रेकर्सकरिता ठिकठिकाणी उंचवटे तयार केले गेले. परंतु त्यावर थर्मोप्लास्टिक पेंट मारला न गेल्याने अपघातांच्या संख्येत अधिकच वाढ झाली. त्यासंदर्भात वाहनधारक तसेच नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले गेले. परंतु थर्मोप्लास्टिक पेंटचा थर दिला गेला नाही. या कामात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर अखेर कारवाईच्या भीतीने ठेकेदाराकडून थर्मोप्लास्टिक पेंटसह अन्य उपाययोजनांना सुरुवात केली गेली.

विभागनिहाय स्पीडब्रेकर
विभाग स्पीडब्रेकर            संख्या
पूर्व                                   ६८
पश्चिम                               ३६
पंचवटी                             ८९
नाशिक रोड                       ४८
सिडको                             ६०
सातपूर                              ३२
एकूण                              ३३३

अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शहरातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. कामात त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्यास ठेकेदाराला नोटीस बजावून कारवाई केली जाईल. – शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा.

ब्लॅक स्पॉट अपघाताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण मानले जाते. अशा ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे अपघात होण्यासारखे आहे. ही ठिकाणे इतकी धोकादायक का असतात? याचे कारण काय असू शकते आणि त्यावर उपाय काय, या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट्स का म्हणतात? याबद्दल आपण जाणून घेऊया.

यामुळेच होतात अधिक अपघात
जिथे दाट लोकवस्तीचा रस्ता, अशा ठिकाणाहून लोक पुन्हा पुन्हा रस्ता ओलांडतात, रस्त्याच्या बांधकामात होणारे दुर्लक्ष आणि जास्त रहदारीमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था बराच काळ त्याची काळजी न घेतल्यास हा रस्ता अपघातांचे माहेरघर बनू लागल्याचेही दिसून येत.

Speed Breaker pudhari.news
Speed Breaker pudhari.news

म्हणूनच याला ब्लॅक स्पॉट म्हणतात
रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल यावर भर दिला जातो.

हेही वाचा: