राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

अंगणवाडी कर्मचारी संप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा अकरा दिवसांपासून संप पुकारल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच त्यांच्याकडे पोषण आहारासारखेही काम आहे. संपामुळे जिल्ह्यातील साधारणपणे ३ लाख बालकांचा पोषण आहार बंद झालेला आहे, याचा परिणाम कुपोषण वाढीवर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाला दहा उलटूनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. या काळात जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाचा दुसरा आठवडा आहे. या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच गर्भवतींची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होत आहे.

अंगणवाडी सेविकांच्या या मागण्यांमध्ये ग्रॅच्यूईटीबाबत कोर्टाच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना किमान 18 हजार ते 26 हजारपर्यंत मानधन वाढ करावी, आहाराचा दर सर्वसाधारण बालकाला 16 रुपये व अति कुपोषित बालकाला 24 रुपये करावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षांचा लाभ द्यावा. सेवासमाप्ती नंतर मृतसेविका मदतनिसांना एक रकमी लाभ त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीद्वारे अंगणवाडी सेविका-मदतनिस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे.

हेही वाचा :

The post राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान appeared first on पुढारी.