राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, रायगड, नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल ४० हजार कोटींची नवी गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून सुमारे १.२० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, सुवर्णत्रिकोणात स्थान असलेल्या नाशिकला ठेंगा दाखविण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

बुधवारी (दि.२८) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गुंतवणुकीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे ‘ईव्ही’ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. वास्तविक, ईव्ही प्रकल्पासाठी नाशिक सर्वोत्तम ठिकाण असून, यापूर्वी दोन बड्या ईव्ही प्रकल्पांनी नाशिकमध्ये येण्यास स्वारस्य दाखविले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीत जागेची चाचपणी केली होती. नाशिकची कनेक्टिव्हिटी, कुशल मनुष्यबळाचे सोर्स, इतर मूलभूत सुविधा लक्षात घेता, हे प्रकल्प नाशिकला येणे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, राजकीय उदासीनतेमुळे एेनवेळी हे प्रकल्प इतरत्र वळविले गेले.

एकीकडे नाशिकला सुवर्णत्रिकोणात स्थान द्यायचे अन् नव्या उद्योगांना इतरत्र पळवायचे असा खेळ गेल्या काही काळापासून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने नाशिक सर्वोत्तम असतानाही येथे नव्या गुंतवणुकीला का चालना दिली जात नाही असा सवालही उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

राजकीय अनास्था

उद्योगांच्या दृष्टीने सर्वोत्तम जिल्हा असूनदेखील नाशिकमध्ये गुंतवणूक न येणे हे लोकप्रतिनिधींचेच अपयश आहे. नव्या गुंतवणुकीसाठी आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याने जिल्ह्यात गुंतवणूक आणण्यास सरकारकडून फाटा दिला जात असल्याचा आरोपही उद्योग क्षेत्रातून केला जात आहे.

राज्यात ४० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता दिली जात असताना, नाशिकला कुठेही स्थान न देणे नक्कीच निराशाजनक आहे. आता आम्ही उद्योगमंत्र्यांनी निमा पॉवर प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरबाबत केलेल्या घोषणेचा पाठपुरावा करणार आहोत. कारण या क्लस्टरच्या माध्यमातून ४० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक नाशिकला येऊ शकते.

– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

हेही वाचा :

The post राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा appeared first on पुढारी.