राज्य लोकसेवा आयोग : विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी

टायपिंग pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क सेवेच्या सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबतच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्या असून, आता टायपिंग कौशल्य चाचणी बाकी आहे. गेल्या वर्षात विविध संवर्गाच्या हजारो पदांसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या आणि उमेदवार नियुक्त झाले आहेत. त्यामुळे टायपिंगसाठी तेवढे उमेदवार उपलब्ध न होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने १:३ ऐवजी १:५ हे प्रमाण टायपिंग कौशल्यासाठी ठेवावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुख्य परीक्षेला पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये झाली. मुख्य परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी पुढील टायपिंगच्या पात्रता चाचणीसाठी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बोगस उमेदवार टाळले जावे तसेच वाढती स्पर्धा बघता आयोगाच्या वतीने गेल्या वर्षीच्या परीक्षेपासूनच टायपिंग कौशल्य पात्रता चाचणी सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी जागा कमी असल्याने आयोगाने १:३ प्रमाणात विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी घेतली होती. यंदा मात्र राज्य सरकारच्या वतीने सरळसेवा माध्यमातून विविध विभागांच्या हजारो जागांची भरती प्रक्रिया राबवली गेली. यामध्ये अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांमधून अनेक उमेदवार या पात्रता परीक्षेला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोगाने जर १ :५ या प्रमाणात उमेदवारांना बोलावले तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळेल, अशी मागणी अनेक संस्था करत आहेत.

कौशल्य चाचणीकरिता आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 प्रमाणात उमेदवार घेणे आवश्यक आहे. कारण मागील 2-3 महिन्यांत सरळसेवा परीक्षेतून हजारो उमेदवार निवडले गेले आहेत आणि हेच उमेदवार 1:3 या प्रमाणात येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आयोगाला अंतिम निवड यादीसाठी योग्य प्रमाणात उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक आहे. आयोगाने यावर विचार करून कौशल्य चाचणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. – आजम शेख, माहिती आधिकार कार्यकर्ते.

यंदा अमृतमहोत्सवी वर्षामुळे अनेक विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हेच विद्यार्थी गट क च्या टायपिंग चाचणीला येण्याची शक्यता आहे. नव्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी १:३ ऐवजी १:५ चे प्रमाण घेण्यात यावी. – महेश बडे, स्टुडंट राइट.

The post राज्य लोकसेवा आयोग : विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी appeared first on पुढारी.