राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मूल्यमापन अहवाल जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान pudhari.news

नाशिक : आसिफ सय्यद

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वांत शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमार यांनी ताशेरे ओढले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) माता व बाल आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांसह, गरजूंना आरोग्य सेवा पुरविली जाते. यातील कोणत्या सेवा अधिकाधिक देण्यात आल्या, तसेच सुविधांचा रुग्णांना लाभ मिळाला का, याची राज्यस्तरावर दर महिन्यास तपासणी केली जाते. त्यात रुग्णालय, आरोग्यवर्धिनी, रुग्णकल्याण समितीच्या कार्याचेही मूल्यमापन करण्यात येते. राज्यस्तरावर दर महिन्यास मूल्यांकन करून रँकिंग दिली जाते. डिसेंबर महिन्यांचा रँकिंग अहवाल महापालिकेला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यात नाशिक महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाचा राज्यात पाचवा क्रमांक आला आहे. पहिल्या स्थानावर कोल्हापूर, दुसरे सांगली, तिसरे पुणे तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे.

नाशिकला ३१.१४ गुण
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील दर्शकांवर आधारित रँकिंगमध्ये नाशिक महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग पाचव्या स्थानावर आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाला ३१.१४ गुण मिळाले आहेत. पहिल्या स्थानावरील कोल्हापूरला ३६.१७, सांगलीला ३५.७४, पुणे ३२.९६ तर नवी मुंबईला ३१.६२ गुण मिळाले आहेत. (National Health Mission)

या महापालिकांची कामगिरी असमाधानकारक
डिसेंबर महिन्यातील मूल्यमापनात राज्यात सर्वात कमी गुण मिळविलेल्या पाच महापालिकांमध्ये सोलापूर (२१.९७), बृहन्मुंबई (२१.८६), परभणी (२१.४४), छत्रपती संभाजीनगर (१९.९८) व सर्वांत शेवटी जळगाव (१९.१६) चा समावेश आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतही या महापालिकांची कामगिरी असमाधानकारकच राहिली आहे. त्यामुळे संबंधित महापालिकांच्या आयुक्तांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. कामकाजात सुधारणा करावी, अशा शब्दांत आरोग्य सेवा आयुक्त तथा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमार यांनी ताशेरे ओढले आहेत. (National Health Mission)

या कार्यक्रमांकडे लक्ष देण्याची गरज
राज्यस्तरीय मूल्यमापनातील कार्यक्रमनिहाय पहिल्या प्राप्त गुण माता आरोग्य, बालआरोग्य, कुटुंब नियोजन, पीसीपीएनडीटी, आरसीएच पोर्टल, क्षयरोग दूरीकरण, एनएलईपी, एनयूएचएम, कायाकल्प, लक्ष्य, आयुष्यमान भारत, आशा या कार्यक्रमांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आरोग्य सेवा आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी महापालिकेच्या आरोग्यवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून काटेकोरपणे केली जात असून, नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य सेवेत नाशिक राज्यात पहिल्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका, नाशिक.

The post राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मूल्यमापन अहवाल जाहीर appeared first on पुढारी.