रेल्वे रेलिंगमुळे जनावरांची घुसखोरी रोखली जाणार, अपघातालाही आळा

Railway railing pudhari.news

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
आगामी काळात रेल्वेकडून अनेक योजना सुरू केल्या जात असून, त्यात गाड्यांचा वेग वाढविला जाणार आहे. रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या भागातून जनावरे रुळावर आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रुळाच्या दोन्ही बाजूने संरक्षण रेलिंग उभारण्याचे निश्चित करून त्याप्रमाणे काम सुरू केले आहे.

रेल्वे बोर्ड प्रशासकीय धोरणानुसार रेल्वेची प्रवासी व मालवाहतुकीची गती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांना गती देण्यासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने खुल्या जागातून जनावरांचा अडथळा निर्माण होतो व अपघात होतात. अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्टीलचे संरक्षक रेलिंग उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

वंदे भारत ट्रेनसह इतरही अति वेगवान गाड्या रेल्वेमार्गावर धावत आहेत. गतिमान प्रवासासाठी प्रवासी रेल्वेची वेगमर्यादा आगामी काळात वाढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठलेही प्राणी अथवा मानव रेल्वेमार्गावर येऊन अपघात आणि जीवितहानी होऊ नये, हाच संरक्षक स्टील रेलिंग उभारण्यामागे हेतू असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. सध्या मध्य रेल्वेमार्गावर मुंबई ते जालना आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या वंदे भारत ट्रेनच्या संख्येत अजूनही वाढ होण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे इतरही प्रवासी रेल्वेच्या वेग मर्यादेत वाढ करण्याचा मानस रेल्वे मंत्रालयाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर अपघातरहित आणि गतिमान प्रवासासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.

नवीन उपायांत रेल्वेमार्गाच्या दुतर्फा संरक्षक कठडे उभारणी, जुन्या पारंपरिक स्लीपरऐवजी काँक्रीटचे स्लीपर टाकणे यांचा समावेश आहे. अस्वली ते देवळाली कॅम्पदरम्यान काँक्रीटचे स्लीपर टाकण्यात आले आहेत. इतरही ठिकाणचे जुने स्लीपर्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भगूर पांढूर्ली उड्डाणपुलापासून ते देवळाली रेल्वे स्टेशनपर्यंत दोन्ही बाजूने स्टील रेलिंग उभारण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेमार्गावर कोणतेही जनावरे येऊ शकणार नाहीत.

भगूर गावातील भुयारी मार्गापासून स्टील रेलिंग लावण्याच्या कामास प्रारंभ झाला. त्यामुळे भगूरकरांना गावात ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. स्टील रेलिंगच्या संरक्षक कठड्यामुळे रेल्वेचे अपघात तर कमी होतीलच शिवाय अनेकांचे प्राण वाचणार आहेत.

हेही वाचा:

The post रेल्वे रेलिंगमुळे जनावरांची घुसखोरी रोखली जाणार, अपघातालाही आळा appeared first on पुढारी.