लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार

लाचखोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकासह तिघा कर्मचाऱ्यांविरोधात ठोस पुरावे आढळल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालयात अभियोग दाखल करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. यासंदर्भातील दोन स्वतंत्र प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत.

सिटी सेंटर मॉलमागील अनधिकृत चहाची टपरी महापालिकेच्या हॉकर्स झोनमध्ये अधिकृत करून देण्यासाठी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक अधीक्षक तथा कनिष्ठ लिपिक राजू वाघ, शिपाई प्रविण इंगळे यांनी लाच मागितल्याची तक्रार होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गतवर्षी दि. ६ जानेवारी २०२३ रोजी सापळा रचत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या वाहनतळात या दोन्ही कर्मचाऱ्यांना १८०० रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. वाघ यांनी लाचेली मागणी केली तर इंगळे यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या घटनेत नाशिक पश्चिम विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील वरिष्ठ लिपिक प्रेमलता कदम यांनी जन्माचा दाखला देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. २९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांना पाचशे रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्या विरोधातही सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिस खात्याने महापालिकेकडून परवानगी मागितली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ लिपिक प्रेमलता कदम, कनिष्ठ लिपिक वाघ, शिपाई इंगळे यांच्याविरोधात न्यायालयात अभियोग दाखल करण्यासाठी महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

अशी आहे तरतूद

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५९ अ मधील तरतुदींनुसार महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर खटला भरण्याची मागणी पोलिसांकडून किंवा अन्य कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असेल तर त्यास मंजूरी देण्यास आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. न्यायालयात अभियोग दाखल करण्यासाठी आयुक्त हे महासभेवर प्रस्ताव सादर करतील. महासभेच्या मान्यतेनंतर पोलिसांना संबंधित कर्मचाऱ्यावर दोषारोपपत्र सादर करण्याची परवानगी दिली जाते.

हेही वाचा :

 

 

The post लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार appeared first on पुढारी.