पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा 

इंधन पुरवठा, www.pudhari.news

मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील तरतुदींवरून मालवाहतूकदार जागेवर खिळून निर्माण झालेली तेलकोंडी मंगळवारी (दि.२) दुपारी फुटली. दोन दिवसांच्या बंदमुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा भरून काढण्यासाठी पानेवाडीच्या तिन्ही तेल प्रकल्पांतून रात्रंदिवस इंधनपुरवठा झाला. साधारण २४ तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एक कोटी लिटरहून अधिक पेट्रोल- डिझेल पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या २४ तासांत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने अपघातस्थळावरून पोलिस व यंत्रणेला माहिती न देता परागंदा होणाऱ्या वाहनचालकांना १० वर्षांचा कारावास आणि जबर दंडाची तरतूद केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मालट्रक, टँकरचालकांनी मंगळवारी काम बंद केले. या आंदोलनात मनमाडजवळील पानेवाडी व राजापूर येथील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या प्रकल्पांतून राज्याच्या विविध भागांत इंधनपुरवठा करणाऱ्या सुमारे दोन हजार टँकर आणि ट्रकचालकांनी सहभाग घेतल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक झाली. पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला. शासन स्तरावर दखल घेतली जाऊन अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मनमाडला धाव घेत इंधन वाहतूकदारांशी चर्चा करत बंद मागे घेतला गेला. त्यासोबत पानेवाडी भागातील तिन्ही कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यभरातील पंपांच्या दिशेने इंधनाचे टँकर रवाना झालेत. ‘बीपीसीएल’मधून १० जिल्ह्यांत सुमारे २०० टँकरच्या माध्यमातून लाखो लिटर इंधनपुरवठा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयओसी आणि एचपीसीएल या प्रकल्पातूनदेखील जलदगतीने इंधनपुरवठा झाला आहे. परिणामी, त्या-त्या भागातील इंधनटंचाई पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे.

१० वाजेपर्यंत १६०० टँकर मार्गस्थ!

बीपीसीएल, आयओसी आणि एचपीसीएल या प्रकल्पांतून अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, पुणे यांसह राज्यातील वेगवेगळ्या भागांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. येथील तिनही प्रकल्पातून साधारण १८०० टँकर धावतात. बंद मागे झाल्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत १३०० टँकर रवाना झाले होते. हे प्रकल्प रात्री १० वाजेपर्यंत सुरु असतात. या वेळेत अजून ३०० टँकर ही भरुन आपापल्या पंपांकडे जातील, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा  appeared first on पुढारी.