लासलगाव बाजार समितीची कामगिरी भारी! राज्यात प्रथम

लासलगाव बाजार समिती,www.pudhari.news

लासलगाव(जि. नाशिक) वार्ताहर : सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी राज्याच्या पणन संचालनालयामार्फत आर्थिक वर्षांतील कामगिरीच्या आधारावर जाहीर करण्यात आली असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यांतील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

क्रमवारीसाठी कोणत्या होत्या अटी?

बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण ३५ निकष तयार करण्यात आलेले होते. या निकषाशी संबंधित माहितीची संबधित तालुका व जिल्हा स्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण २०० गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची सन २०२२-२३ या वर्षांची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीला प्रथम क्रमांकाने निवडण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post लासलगाव बाजार समितीची कामगिरी भारी! राज्यात प्रथम appeared first on पुढारी.