वणी परिसरात बिबट्यांची दहशत; पाळीव कुत्रे फस्त

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– वणी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाळीव कुत्र्यांना फस्त करत बिबटे मुक्तसंचार करत असल्याने हा नागरी सुरक्षेचा प्रश्न झाला आहे. फोपशी, दहवी, सागपाडा, आंबानेर भागात तसेच मावडी, रामनगर, लव्हारा डोंगर परिसर, टेकाडी, भातोडा, मांदाने या भागात बिबट्याचा वावर आहे. अनेकांना ते दृष्टीस पडले आहेत. गत आठवड्यात कळवण रस्त्यालगत राजू कड हे द्राक्षबागेत औषध फवारणी करत होते. तेव्हा अचानक दोन बिबटे समोर आल्याने त्यांची तारांबळ उडाली. प्रसंगावधान राखत कड यांनी फवारणीचा ट्रॅक्टर जोरात पाठीमागे घेतला. त्या आवाजाने बिबट्यांनी धूम ठोकली. सध्या द्राक्षबाग कामांचा हंगाम सुरू आहे. बिबट्यांच्या भीतीपोटी मजूर काम करण्यास धजावत नाही. परिणामी, बागायतदारांसह मजुरांचेही नुकसान होते. (Nashik Leopard News)

दुसऱ्या एका घटनेत गणेश देशमुख यांच्या मळ्यातील पाळीव कुत्रा ठार झाला. पीटबुल जातीच्या या कुत्र्याने बिबट्याचा चांगलाच प्रतिकार केल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीतून स्पष्ट होते. तेथे बिबट्याचे केस आणि कुत्र्याला फरफटत ओढून नेल्याच्या खुना दिसून आल्या. या शिवारातील सुनील बर्डे, बाळूभाऊ गोलांडे व रवींद्र कड यांनी परिसरात बिबट्याला पाहिले असल्याचे सांगितले. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार वनक्षेत्रपाल पूजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी अण्णा टेकनर, हेमराज महाले यांनी त्या-त्या परिसराला भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

उसतोडीने वन्यप्राणी सैरभैर

करंजवण व पुणेगाव धरण परिसरात, वागळुद, दहेगाव, काजीमाळे, माळे, हस्ते या पाणीदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊसलागवड होते. आता ऊसतोड हंगाम सुरू झाल्याने वन्यप्राण्यांची वास्तव्याची ठिकाणं नाहीशी होत आहेत. नवीन सुरक्षित जागा आणि भक्षाच्या शोधात बिबट्यांसारखे वन्यप्राणी सैरभैर होत नागरी वस्तीपर्यंत येत आहेत. कुत्रे, शेळ्या, पाळीव जनावरांना ते लक्ष करतात. पशुधन व नागरी सुरक्षा धोक्यात येत असल्याने वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबटे पकडून त्यांना दूर जंगलात सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post वणी परिसरात बिबट्यांची दहशत; पाळीव कुत्रे फस्त appeared first on पुढारी.