वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

BSNL pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
मोबाइलच्या वाढत्या स्पर्धेमुळे बीएसएनएलचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत चालले असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएल शेवटची घटका मोजतोय का? असे म्हणायची वेळ आली आहे. अपुरी कर्मचारीसंख्या, खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत प्रचंड घट सुरू झाली आहे.

एकेकाळी बीएसएनएलचे लँडलाइन कनेक्शन घेण्यासाठी सहा सहा महिने वेटिंग करावे लागत असे. कुणाची खासदाराची ओळख असेल तर खासदाराचे पत्र घेऊन बीएसएनएल कार्यालयात देत कनेक्शन मिळविले जात होते. ज्यांच्या घरात बीएसएनएलचा लँडलाइन फोन, अशा व्यक्तीला समाजात वेगळी पत होती. कालांतराने भारत संचार निगमने जागोजागी पीसीओ, एसटीडी दिले. त्यात एक रुपया टाकून ग्राहक फोन लावत होते. परंतु मोबाइलमु‌ळे आता हे चित्र कायमचे इतिहासजमा झाले आहे. खासगी कंपन्यांचा मोबाइल क्षेत्रात बोलबाला दिसून येत आहे,

सध्याच्या युगात शासकीय कार्यालय, बँका, सायबर कॅफे, सेतू कार्यालय, आधार केंद्र आदींसह विविध ठिकाणचे कामकाज डिजिटल झाल्याने मोबाइल व नेटचा वापर वाढला आहे. बीएसएनएल अजूनही फास्ट नेटवर्क देण्यात सक्षम नसल्याने खासगी कंपन्यांच्या ब्राॅडबँडला पसंती दिली जाते.

ग्राहक संख्येत घट झाल्याने केंद्र सरकारने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय घेऊन कर्मचारी कपात केली, सध्या मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून काम केले जात आहे. एकेकाळी दिवसभर वर्दळ असणारे बीएसएनएल कार्यालय आता ओस पडले असून, बीएसएनएल कार्यालय आता आधार केंद्र झाल्याने केवळ आधार लिंक व आधार संबंधित कामकाजासाठी कार्यालयात रेलचेल असते.

पूर्वी अनेक कार्यालयात २ सहायक अभियंता, २ कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, ४ टेक्निशियन , ४ लाइनमन असे मनुष्यबळ होते. आज केवळ एकच अधिकारी काम बघतो. त्याला मानधन तत्त्वावर एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. बीएसएनएलचे तालुक्यात फायबर आॅप्टिक कनेक्शन ६५० असून, १९ टॉवर आहेत.

हेही वाचा:

The post वाढती स्पर्धा 'बीएसएनएल'साठी ठरली डोकेदुखी appeared first on पुढारी.