शरद पवारांच्या सभा लोकशाहीचा भाग : उद्योगमंत्री सामंत

उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नेत्यांची सभा होणे हा लोकशाहीतील भाग आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सभांमधून त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच अजित पवार, शिवसेना म्हणून आम्हीही आमचे विचार मांडणार. विचार मांडल्यानंतर लोक आम्हाला स्वीकारणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी सभांना सुरुवात केली म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नोंदविले.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतचे विधान केले. ते म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पब्लिसिटी स्टंट असल्याच्या टीकेलाही उत्तर दिले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे सव्वा कोटी जनतेला लाभ झाला. त्यामुळे सुळे यांच्या टीकेला काही अर्थ नाही. उलट पुढील काळात हा उपक्रम आणखी जोरदार पद्धतीने लोकांपर्यंत पाेहोचविला जाणार आहे.

राज ठाकरे यांननी मुंबई-गोवा महामार्गावरून केलेल्या टीकेवर बोलताना सामंत म्हणाले, ‘ठेकेदाराच्या तांत्रिक अडचणींमुळे महामार्गाचे काम काही टप्प्यात अर्धवट राहिले आहेे. परंतु गणेशोत्सवाअगोदर एका लेनचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांबाबत सामंत म्हणाले, ‘मागच्या वेळी नाशिकला येताना साडेसहा तास लागले होते. आता तीन तासांत नाशिकला आलो. त्यामुळे रस्ते कामाची प्रगती दिसून येते. या महामार्गाबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या घोषणेवरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल दोन तृतीयांश बहुमतांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच सत्तेत येतील. महाविकास आघाडीच्या ४० ते ४५ जागा निवडून येतील, याबाबतच्या सर्व्हेची खिल्ली उडविताना ज्या पक्षांकडे उमेदवार नाहीत, अशा पक्षांच्या ४८ जागा निवडून येतील, असा उपोरोधिक टोला शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसला त्यांनी यावेळी लगावला.

भरत गोगावलेंचे ते विधान विनोदातून
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी, ‘एका आमदाराने मंत्रिपद न मिळाल्यास त्याची पत्नी आत्महत्या करेल, तर एकाने मंत्रिपद न मिळाल्यास नारायण राणे संपवेल’ अशा प्रकारचे विधान करून एकच खळबळ उडवून दिली. याविषयी सामंत यांना विचारले असता, गोगावले यांचे विधान विनोदातून असल्याचे स्पष्ट केले. गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांबाबत कुठलेही नकारात्मक विधान केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू यांना निमंत्रण देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. मात्र, या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याबाबत विचारले असता, आपण स्वत: त्यांना निमंत्रण देणार आहे. यासाठी आपण त्यांच्याशी बोलणार आहे. कडू यांनी स्नेहभोजनासाठी येणार नाही, असे का म्हटले, याबाबत माहिती नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post शरद पवारांच्या सभा लोकशाहीचा भाग : उद्योगमंत्री सामंत appeared first on पुढारी.