नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

क्राईम

नाशिक : मखमलाबाद नाका परिसरातील ललवाणी सदन येथून चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल चोरून नेला. बुधवारी (दि.२१) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र पृथ्वीराज ललवाणी (५५) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी

नाशिक : कालिदास कलामंदिराच्या पाठीमागील उद्यानातून चार चोरट्यांनी चंदनाचा वृक्ष तोडून त्याचा ओंडका चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रणजित शंकर रामराजे (३२, रा. पाथर्डी रोड) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी बुधवारी (दि.२१) मध्यरात्री १.३० वाजता चोरी केली.

शिवाजीनगरला टोळक्याचा गोंधळ

नाशिक : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरात टोळक्याने गोंधळ घालत एका दुकानाच्या शटरचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विक्रम किसनराव देवरे (४४, रा. शिवाजीनगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित मनोज संजय औतारी, आकाश रोशन औताडे यांच्यासह इतर संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संशयितांनी मंगळवारी (दि.२०) रात्री ८.३० वाजता परिसरात गोंधळ घालून देवरे यांच्या दुकानाच्या शटरचे नुकसान करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

आयटीआयच्या जागेतून बेंच लंपास

नाशिक : गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) च्या मोकळ्या जागेतून चोरट्याने १४ हजार रुपयांचा लोखंडी बेंच चोरून नेला. १९ ते २० जूनदरम्यान ही चोरी झाली. या प्रकरणी बाळासाहेब शिवाजी टर्ले (५३, रा. मखमलाबाद रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

सातपूरला युवकाची आत्महत्या

नाशिक : सातपूर येथील कार्बन नाका परिसरात चिंतामण काळू राऊतमाळे (२९) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात वृद्ध प्रवाशाचा मृत्यू

नाशिक : अपघातात रिक्षातील वृद्ध महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना मोरे मळा परिसरात घडली. मंदाबाई बन्सीलाल कर्पे (६२, रा. मखमलाबाद नाका) असे त्यांचे नाव आहे. मंदाबाई या बुधवारी (दि.२१) सकाळी ११ च्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होत्या. मोरे मळा परिसरातून जात असताना ( क्र. एमएच १५, बीए ६१०) दुचाकीस्वाराने उलट दिशेने दुचाकी चालवत रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा उलटल्याने मंदाबाई या गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The post नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास appeared first on पुढारी.