शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. पण, सेना अभेद्य असायला पाहिजे होती. शिवसेना फुटायला नको होती. खूप वाईट वाटत आहे. जेव्हा जे‌व्हा कठीण परिस्थिती असायची तेव्हा बाळासाहेब उभे राहायचे आणि त्यांच्यासोबत लोक उभे राहायचे. त्यात अभ्येद्य अशी एकजूट असायची. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की, लोक पाळायचे, पोलिसांचीसुद्धा भीती नसायची तेव्हा ‘डू आर डाय’ हा पर्वलीचा शब्द असायचा, असे भावनिक वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.

आ. भुजबळ म्हणाले की, आता अनेक लोक शिवसेना सोडून गेले, सध्या अडचणी येत आहे, पण मार्ग नक्की निघेलच. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच, पण आता दोन झाल्या आहेत. आता खरी शिवसेना कोणती हे लोक ठरवतील. आम्ही राजकारणी काही बोलत असलो, उलटसुलट बोललो तरी लोक घरात बसून ठरवतात. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक अनुभवी नेते आहेत ते चर्चा करतील आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही. मनीषा कायंदे अचानक कसे काय गेल्या? कायंदे या कट्टर वाटल्या होत्या. आठ- नऊ महिने सोबत होत्या, पण प्रवाह चालूच आहे. बघू या पुढे काय होते, अशा शब्दांत त्यांनी कायंदे यांच्या शिदे गट प्रवेशाबाबत सांगितले.

पहिले २५ वर्षे मला आजही आठवतात. पहिले जेवढे शाखाध्यक्ष झाले, त्यात मी पण होतो. मी ७८ मध्ये गटनेता झालो होतो. त्यानंतर बाळासाहेब यांनी मला भाषण करण्याची संधी दिली. शिवसेनेने मला गटनेता, महापौर, आमदार केले, या आठवणी यावेळी भुजबळांनी सांगितल्या.

हेही वाचा :

The post शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ appeared first on पुढारी.