सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी देवी

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार आणि भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. देणगीदार भाविकांनी दिलेल्या देणगीतून २५ किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. या मुर्तीवर पंचामृत महापूजा करण्यात येईल. देवीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा कोणतीही इजा होऊ नये किंवा त्यात बदल होऊ नये म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात बदल

पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात बदल करण्यात आला आहे. दैनंदिन स्वरूपात देवीच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो त्यात पाणी, दूध, लोणी, मध, साखर, नारळपाणी आणि तुपाचा यांचा वापर केला जात होता. आता पर्यायी व्यवस्था म्हणून भाविकांच्या योगदानातून २५ किलो चांदी धातूची मूर्ती तयार करण्यात आली. त्यावर पंचामृत महापूजा करण्यात येणार आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धन आणि देखभाल प्रक्रियेनंतर ११ हजार किलो शेंदूर देवीच्या मूर्तीवरून काढण्यात आला होता. या प्रक्रियेनंतर वर्षानुवर्ष डोळ्यात भरलेलं सप्तशृंगी मातेचे रूप बदललेलं भाविकांना पाहायला मिळालं. त्यामुळे आता देवीच्या मूळ स्वरूपाचे रुप जतन व्हायला हवे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऐतिहासिक संदर्भ तपासून निर्णय

धार्मिक, ऐतिहासिक संदर्भ तपासून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. २६ सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेपासून सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असून देवीच्या उत्सव मूर्तीवर म्हणजेच चांदी धातूच्या मूर्तीवारच अभिषेक करण्यात येईल अशी देखील माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कशी असते पंचामृत महापुजा

ही पुजा सकाळी सात ते नऊ या वेळेत होते. या पुजेत देवीला दही, दुध, तुप, मध, सुवासिक तेल व पिठी साखर यांची पंचामृतने स्नान घातले जाते. या स्नानानंतर देवीच्या मस्तकावरून ११ लिटर दुधाचा अभिषेक श्री सुक्ताचे १६ आवर्तनाने केला जातो. यानंतर देवीला गरम पाण्याने स्नान घालून मुर्ती वस्त्राने पुसुन कोरडी केली जाते व शेंदूर लेपण करून देवीला चोळीसह महावस्त्र (पैठणी) नेसवून कपाळावर कुंकु लावले जाते. देवीला अलंकार चढविले जातात. आरती नंतर मंत्र पुष्पाजली व अपराध क्षमापण स्तोत्र म्हटले जाते.

सदर निर्णय हा विश्वस्त मंडळाने घेतला असुन याबाबत 25किलो चांदीच्या मुर्तीवर यापुढे अभिषेक केला जाईल यापुर्वी अनेक वर्षांपासून ८ फुटाच्या स्वंयुभू मुर्तीवर दही ,दुध मध आदि पंच अमुताचा अभिषेक केला जात होता पण मुर्तीच्या देखभाली साठी हा निर्णय गेतला आहे
– दिपक पाटोदकर, विश्वस्त, देवी संस्थान

सप्तशुंगी देवी हि अघशक्तीपीठ व स्वयंभू मूर्ती आहे याठिकाणी परंपरा नुसार विधी होत असतो त्यापद्धतीने देवीची पुजा अर्चा करणे गरजेचे आहे देवीचा अभिषेक बंद करून देवीचे पाविञ नष्ट होऊ शकत नाही
– प्रकाश कडवे , शहर अध्यक्ष भाजप, सप्तशुंगी गड

आई भगवती च्या मुर्ती वर अभिषेक न करण्याचा निर्णय देवी संस्थान ने घेतला आहे पण याबाबत ग्रामस्थाच्या भावना लक्षात घेता किवा चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे होते गावाती ग्रामस्थ फक्त नावापुरते राहील आहे का ?
– गणेश बर्डे, माजी ग्रा.प. सदस्य, सप्तशुंगी गड

सप्तशुंगी देवी संस्थान ने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असुन याबाबत ग्रामस्थाशी चर्चा करणे गरजेचे होते
– सुरेश बतासे, व्यापारी, सप्तशुंगगड

हेही वाचा;

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.