सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

कुंभमेळा नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागावे. मेळ्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सिंहस्थात येणार्‍या भाविकांची सुरक्षितता व सुविधांबाबतचा अभ्यासाचा श्रीगणेशा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दर 12 वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वरला होणार्‍या सिंहस्थामधील शाहीस्नानाच्या तारखा घोषित झाल्याने एक प्रकारे सिंहस्थाचा शंखनाद झाला आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने पाच वर्षे आधीच तयारी सुरू केली आहे. तर त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारच्या हालचाली घडताना दिसून येत नव्हत्या. ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (दि.10) पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी कुंभमेळा आयोजनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर ना. भुसे यांनी तातडीने सिंहस्थाच्या तयारीला लागावे. तसेच वर्षाअखेरपर्यंत सर्वतोपरी आराखडा तयार करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. ना. भुसे यांच्या आदेशाला 24 तासांचा कालावधी लोटत नाही, तोच जिल्हा प्रशासन कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. सिंहस्थात येणार्‍या भाविकांच्या सुविधा, सुरक्षितता व उपाययोजनासंदर्भात गेल्या कुंभमेळ्यातील अभ्यास जिल्हाधिकार्‍यांनी सुरू केला आहे. 2014-15 च्या कुंभमेळ्यात सुमारे 1,700 एकर जागेचे तात्पुरते संपादन करण्यात आले होते. त्यानुसार जागेचे संपादन, कुंभमेळ्यापूर्वी गोदा प्रदूषणमुक्तीसाठी उपाय राबविणे, वाहतुकीचे मार्ग, पर्वणी काळातील नियोजन तसेच आवश्यक निधी आदींबाबत हा अभ्यास करण्यात येणार आहे.

कामांची घेणार माहिती :
नाशिक व त्र्यंबकेश्वरला 2014-15 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. या निधीमधून विविध विभागांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार विकासकामे करण्यात आली. कोणत्या विभागाने कोणती व किती कामे केली, त्यासाठी किती निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती प्रशासन घेणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकरच सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल. 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्यांच्या सूचना घेण्यात येणार आहेत. तसेच विविध आखाड्यांसाठी जागा संपादन, वाहतूक व्यवस्था, भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्याबाबत अभ्यास करून तसा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा:

The post सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर appeared first on पुढारी.