सिडकोमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार, मुलगा जखमी

accident,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

उत्तमनगर येथील बुरकुले हॉलच्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास छोटा टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणी अबंड पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास टेम्पोचालक हर्षल राजेंद्र गोरे (२९, रा. उत्तमनगर) हा त्याचा टेम्पो (क्र. एमएच १५ एचएच ६३४१) घेऊन बुरकुले हॉलकडे जात होता. त्यावेळी याच मुख्य रस्त्याने शशिकांत श्रीराम अवसरकर (४०, रा विजयनगर, सिडको) हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १५ डीएच ०३४१ पत्नी, मुलगा व मुलगी असे मित्राकडे निघाले होते. मात्र बँक ऑफ इंडियासमोरच टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक शशिकांत अवसरकर हे खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा स्वरूप (९) हा खाली पडल्याने त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच, पत्नी व मुलगी थोडक्यात बचावले. घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते भूषण भामरे यांनी तत्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला पाचारण करून तोपर्यंत घटनास्थळावरील गर्दी पांगविण्याचे काम केले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या नंतर टेम्पोचालक हर्षल राजेंद्र गोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे अधिक तपास करीत आहेत. मृत शशिकांत अवसरकर हे कंपनीत कामगार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

उत्तमनगर येथील बुरकुले हॉलच्या मागे नवीन वसाहती वाढल्यामुळे या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने जात असल्यामुळे कायम अपघात होत असतात. या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post सिडकोमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार, मुलगा जखमी appeared first on पुढारी.