सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी

सुधाकर बडगुजर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटोतील आरोपींसोबत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंध राज्यात घळबळ उडाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ हिवाळी अधिवेशनात सादर केल्यानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या व्हिडीओ आणि फोटोची गंभीर दखल घेत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, बडगुजर यांचा समर्थक पवन मटाले याच्यासह तिघांची चौकशी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी (दि. १५) विधानपरिषदेत मांडलेल्या मुद्द्यावरुन पालकमंत्री दादा भुसे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक पोलिसांनी स्थानिक स्तरावर चौकशी सुरू केली आहे. व्हायरल व्हिडिओ आणि विधानसभेत दाखविलेल्या फोटोंनुसार बडगुजर यांचा खंदा कार्यकर्ता समजल्या जाणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) सिडको विभागप्रमुख पवन मटाले यांच्यासह तिघांना चौकशीकरीता बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई करुन व्हिडिओ व फोटोंची सत्यता पडताळण्यास सुरूवात केली. दुपारी दीड वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत मटाले यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अन्य दोघांची देखील चौकशी करून त्यांना सोडण्यात आल्याचे समजते.

गृह मंत्रालयातर्फे या प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन होणार आहे. स्थानिक स्तरावर या प्रकरणी काही व्यक्तिंची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानुसार संबंधित व्हिडिओतील व्यक्ति व घटनेचा तपास सुरू आहे.

– प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे

हेही वाचा :

The post सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी appeared first on पुढारी.