स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

कळवण रुग्णवाहिका pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
कळवण उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी महिलांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. येथून जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने या रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातच स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती काय असेल याबाबत विचार केलेलाच बरा. कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील छकुली चेतन महाले ही माता प्रसूतीसाठी शनिवारी (दि. 6) सकाळी 11 च्या सुमारास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली असता त्यात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून, त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. या बाळाला लागणार्‍या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेने या मातेस जिल्हा रुग्णालयात पाठवले. परंतु वणीजवळच या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने नातेवाइकांची तारांबळ उडाली. संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली. तेथील उपस्थित बालरोगतज्ज्ञ डॉ. नेहा सिंगल यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोट्यवधी रुपये आरोग्यासाठी आणल्याच्या वल्गना होत असताना ग्रामीण भागातील गरोदर मातांची आवश्यक मुबलक सुविधांअभावी तसेच रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत असल्याने याकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

…तर रुग्णवाहिकेत प्रसूतीची वेळ आली नसती
कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ पद आजही रिक्त आहे. जर स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची वेळ या मातेवर आली नसती. जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालयात पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्यसेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हेळसांडच होत असते. तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील. तसेच रिक्त पदे लवकर भरले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गरोदर मातेच्या सोनोग्राफीचा अहवाल तपासणीनंतर बाळाचे हृदय विरुद्ध बाजूने असून, त्याला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. प्रसूतीनंतर बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने बाळाच्या सुरक्षितेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. 108 रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने 102 रुग्णवाहिकेमध्ये मातेला पाठवण्यात आले होते. – डॉ. कमलाकर जाधव, वैद्यकीय अधिकारी कळवण.                        

सदर गरोदर मातेला 102 रुग्णावाहिकेमध्ये जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वणीजवळ रस्त्यात रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झाली. त्यानंतर त्या मातेला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या बाळाची तपासणी करण्यात आली. बाळाची अवस्था बिकट असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. – डॉ. नेहा सिंगल, बालरोगतज्ज्ञ वणी ग्रामीण रुग्णालय

प्रसूतीसाठी सकाळी 11 च्या दरम्यान आम्ही कळवण उपजिल्हा रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी नाशिकला हलवण्याचे सांगितले. रुग्णवाहिकेमध्ये येत असताना रस्त्यातच प्रसूती झाली. जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या आधी कळवण रुग्णालयात सुविधा उपलब्ध असती तर प्रसूती झाली असती. आमचे रस्त्यातच हाल झाले नसते. – चेतन महाले, पीडित मातेचा पती.

हेही वाचा:

The post स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती appeared first on पुढारी.