हनुमान जयंती : काय आहे हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा इतिहास?

अंजनेरी किल्ला नाशिक

त्र्यंबकेश्वर : देवयानी ढोन्नर

नाशिक पासून जवळपास 23 किमी अंतरावर असलेल्या अंजनेरी येथील अंजनेरी गड हनुमान जन्मस्थान म्हणून सर्वदुर जनमानसात परिचित आहे. नाशिक त्र्यंबक रस्त्यावर त्र्यंबक पासून चार किमी अंतरावर अंजनेरी गावात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तेथून अंजनेरी किल्यावर पोहचता येते. पावसाळा असेल अथवा उन्हाळा सर्व ऋतुत पर्यटकांना खुनावणाऱ्या अंजनेरी किल्ल्याला ऐतिहासिक आणि पौराणीक पार्श्वभूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख ऋषीमुख पर्वत म्हणून येतो. ब्रम्हगिरीच्या जवळ पूर्वेला असल्याचे ब्रह्मपुराणात आलेले वर्णन तंतोतंत जुळते. तसेच प्रभुश्रीराम वनवासात असतांना त्यांची हनुमंताशी झालेली भेट, शबीरीची कथा, पंपास तिर्थ यासारख्या परिसरातील स्थळ खुना याची साक्ष देतात. नवनाथ ग्रंथात या स्थळाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. (Hanuman Jayanti 2024)

म्हणून किल्ल्याला अंजनेरी नाव पडलं

इतिहासात शिलाहर, यादव राजवटीच्या प्राचीन मंदिरांच्या स्वरूपातील अवशेष आजही याची साक्ष देतात. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री च्रकधर स्वामी यांनी अंजनेरी येथे वास्तव्य केले आहे. येथे असलेली पुरातन जैन आणि हिंदु मंदिर येथे हजारो वर्षांपासून लोकसंस्कृती होती याची कल्पना देणारी आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. गडावर अंजनीमाता आणि बालहनुमान यांची मुर्ती असलेले दगडी बांधकामातील मंदिर आहे. याच डोंगराच्या परिसरात भगवंत हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. (Hanuman Jayanti 2024)

काय काय आहे, अंजनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखे? (Hanuman Jayanti 2024)

येथे १०८ जैन लेणी आहेत. अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. गडावर सीता गुहा आहे. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. ब्रिटीश राजवटीच्या कालावधीत इंग्रज अधिकारी उन्हाळ्यात किल्ल्यावर वास्तव्यास असत. येथे महाबळेश्वर प्रमाणे थंड हवेचे ठिकाणी असते तसे वातावरण अनुभवास येते. पठारावर मोठा तलाव आहे. तेथे बारा महिने पाणी असते. ब्रिटीश राजवटीच्या कालावधीत झालेल्या बंधकामांचे अवशेष येथे आजही पहावयास मिळतात.

जयंतीला लाखो भाविक रात्रीच गडावर होतात दाखल

अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव पुर्वी पासून संपन्न होत असतो. त्यासाठी लाखो भाविकांची हजेरी लागते. राज्यातून तसेच परराज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच शारदीय नवरात्र उत्सवात देखील येथे भाविक येतात. घटस्थापना करतात व मुक्कामी असतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. हनुमान जयंतीला म्हणजेच चैत्र पौर्णिमेला सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उत्सव संपन्न होत असतो. त्यासाठी हजारो भाविक रात्रीच गडावर मुक्कामी आलेले असतात. सकाळी सुर्योदय होत असतांना जन्मोत्सव होतो. विशेष म्हणजे रामायणात हनुमानाचा जन्म झाला आणि बाल हनुमानास उगवते सुर्यबिंब एखाद्या फळा सारखे भासले म्हणून त्याने झेप घेतली असा उल्लेख आढळतो. आजही जन्मोत्सवाच्या वेळी पूर्वेला उगवलेले सुर्यबिंब लाल शेंदरी एखाद्या फळा सारखे दिसते. भाविक त्या दर्शनाचा आनंद घेतात.

हेही वाचा :