‘होमेथॉन’ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मंत्रभूमी, तंत्रभूमी, वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला आता ‘वेलनेस सेंटर’ ही नवी ओळख प्राप्त होत आहे. नाशिकमध्ये वेलनेस इंडस्ट्रीला मोठा वाव असून, त्यादृष्टीने शाश्वत विकास होण्याची गरज आहे. त्यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित ‘होमेथॉन’ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, एनएमआरडीए आयुक्त सतीश खडके, सिमल्याचे विभागीय आयुक्त संदीप कदम, सह जिल्हा निबंधक कैलास दवंगे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नरेडको मुंबईचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर, बँक ऑफ महाराष्ट्राचे सी. बी. सिंग, एलआयसी हाउसिंगचे गायके, मनपा नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन आदी उपस्थित होते.

पुढे गमे म्हणाले, ‘नाशिकची तुलना नेहमीच पुण्याच्या विकासाशी केली जाते. मात्र, पुण्याचा विकास का झाला याविषयी स्थानिक निर्णयकर्त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. वास्तविक, पुण्याचा एक्स्प्रेस वे झाला, तेव्हा नाशिकच्या एक्स्प्रेस वे चे सर्वप्रथम सर्वेक्षण झाले होते. याशिवाय इतरही बरेच असे प्रकल्प आहेत, जे पुण्याअगोदर नाशिकमध्ये होणार होते. मात्र, स्थानिक निर्णयकर्त्यांमुळे हे प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी झेप घेण्याची संधी असून, शासनव्यवस्था त्यांना मूलभूत धोरण आखत आहे. ई रजिस्ट्रेशन असो वा ई-हक्काच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या आहेत. विकासकांनी याचा वापर करून व्यवसायात सुलभता आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राने आपली विश्वासार्हता टिकविल्याचे सांगत झपाट्याने होत असलेल्या नाशिकच्या विकासात या क्षेत्राचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सतीश खडके यांनी नाशिकमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळत असल्याचे सांगितले. तर संदीप कदम यांनी देशाच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राचे मोठे योगदान असून, १० ते १२ टक्के जीडीपीपर्यंत नेण्याची संधी असल्याचे स्पष्ट केले. तर ॲड. ठाकरे यांनी, नेतृत्वाअभावी नाशिकचा विकास खुंटल्याचे स्पष्ट केले. जयेश ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. नंदन दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर शंतनू देशपांडे यांनी आभारप्रदर्शन केले.

तीन ग्राहकांना चांदीचे नाणे

होमेथॉन प्रदर्शनात घर, प्लॉट, फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांना तत्काळ चांदीचे नाणे भेट दिले जाते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीन भाग्यवान ग्राहकांना हे नाणे भेट देण्यात आले. नेरकर प्रॉपर्टीज यांच्याकडे पहिल्याच दिवशी तीन बुकिंग झाले असून, ग्राहकांना मान्यवरांच्या उपस्थितीत नाणे भेट देण्यात आले.

हेही वाचा :

The post 'होमेथॉन' प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.