होळकर पुलाखालील प्रकार, फिरस्त्या व्यक्तिचा दगडाने ठेचून खून

पंचवटी खून pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव स्टँडवरील डाव्या बाजूने होळकर पुलाखाली उतरण्यासाठी असलेल्या पायरीजवळ शौचालयालगत एका ४० ते ४५ वर्षीय फिरस्त्या व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृण खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत संशयित सचिन रमेश वनकर (वय १९, रा. गोदाघाट, पंचवटी) व विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि ०९) मध्यरात्री अडीचच्या सुमारास संशयित सचिन वनकर व त्याचा अल्पवयीन साथीदार दारूच्या नशेत असताना होळकर पुलाखाली असलेल्या पायरीजवळ एका फिरस्त्यासोबत (मृत व्यक्तीचे नाव उपलब्ध नाही) किरकोळ कारणावरून वाद झाले. यातूनच संशयित वनकर याने फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर दोघा संशयितांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केला. यानंतर दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. रविवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास याठिकाणी अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला काही नागरिकांना दर्शनास आले. त्यांनी मालेगाव स्टॅंड पोलिस चौकीच्या पोलिसांना माहिती कळविली.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, नंदन बगाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर,रायकर, पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यासह पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेजची पोलीसांनी तपासणी करीत संशयितांचा शोध सुरू केला असता, पेठ रोडवरील अश्वमेधनगर मधून अवघ्या काही तासांत वनकरला अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post होळकर पुलाखालील प्रकार, फिरस्त्या व्यक्तिचा दगडाने ठेचून खून appeared first on पुढारी.