14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई

मिरवणुका www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात १३ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यात १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन धुळे जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस पुढील कृत्य करण्यास मनाई करीत आहे. यात रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी गैररितीने चालणे, गैरशिस्त वर्तवणूक करण्यास मनाई करीत आहे. कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त मार्गाने नेण्यास मनाई असेल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व प्रार्थना स्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागी, लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी करण्यास, अडथळा निर्माण करण्यास मनाई आहे.

सर्व रस्त्यांवर, रस्त्यांमध्ये, घाटात, घाटावर, सर्व धक्क्यांवर, धक्क्यांमध्ये, सार्वजनिक स्नानाच्या उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी, जागांमध्ये, जत्रा, देवालय, मशीद, दर्गा, सार्वजनिक, लोकांच्या जाण्या- येण्याच्या जागांमध्ये गोंधळ, बेशिस्त वर्तन करण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही रस्त्यात, रस्त्याजवळ, सार्वजनिक अनियमित व विना परवाना जागी वाद्य वाजविण्यास, गाणे म्हणण्यास, ढोल, ताशे वाजविण्यास, कर्कश वाद्य वाजविण्यास मनाई आहे. कोणत्याही सार्वजनिक जागेत, जागेजवळ, कोणत्याही सार्वजनिक उपाहाराच्या जागेत ध्वनिक्षेपणाचा विना परवाना उपयोग करण्यास सक्त मनाई आहे.

समाजकंटक व्यक्ती दुरुपयोग करू शकतील, अशी कोणतीही वस्तू, मिरवणुकीत बाळगण्यास मनाई आहे. परवानगीची आवश्यकता असल्यास धुळे जिल्हा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपापल्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसार आवश्यक त्या कोणत्याही नियमांच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, अशा रितीने आवश्यक तो आदेश देण्याचा अधिकार प्रदान करीत असल्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा –

The post 14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई appeared first on पुढारी.