AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान

येवला www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

कडक उन्हाच्या आणि ढगाळ वातावरणाच्या सावटाखाली आव्हान आणि प्रतिआव्हान यामुळे चर्चेत आलेली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 2658 पैकी 2617 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शहरातील विंचूर रस्त्यावर असलेल्या जनता विद्यालयात शुक्रवारी (दि.28) सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीड दोन नंतर मतदान प्रक्रियेला वेग आला. यावेळी मतदारांना कॅमेरा असलेले मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मनाई केलेली होती. आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अंबादास बनकर माजी आमदार मारोतराव पवार, शिवसेनेचे संभाजी पवार यांचा शेतकरी विकास पॅनल तर त्यांचे विरुद्ध माणिकराव शिंदे, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, भाजपचे बाबा डमाळे यांचे सहप्रहार शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांचा शेतकरी समर्थक पॅनल अशी सरळ लढत यावेळेस बघायला मिळाली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भुजबळांच्या पॅनलसमोर दुसऱ्या पॅनल पूर्ण न होता बहुतांश जागा बिनविरोध होतील अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र माणिकराव शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेत बिनविरोध होत असलेल्या या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाची संधी देण्यासाठी शेतकरी समर्थक पॅनलची निर्मिती केली. त्यात तीन-चार दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडीमुळे दराडे आमदार बंधूंनी शेतकरी समर्थक पॅनलच्या समर्थनार्थ आपली यंत्रणा उभी केली. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात रंगत आली असल्याची चर्चा सुरू होती. या ठिकाणी दोन्ही पॅनलच्या कार्यकर्ते व समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बाहेर जमा असलेल्या कार्यकर्त्यांना शेतकरी समर्थक पॅनलचे माणिकराव शिंदे यांनी संबोधित करीत मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळेस आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, विठ्ठलराव शेलार, बाबासाहेब डमाळे, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, येमको चे संचालक प्रमोद सस्कर, गोरख पवार आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

असे झाले मतदान….
सोसायटी गटात 1048 पैकी 1036
ग्रामपंचायत गटात 834 पैकी 832
व्यापारी गटात 423 पैकी 402
हमाल मापारी गट 353 पैकी 347

The post AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान appeared first on पुढारी.