Blue tea : ग्रीन टी, ब्लॅक टी नंतर आता आरोग्यदायी “ब्लू टी’, गोकर्णच्या फुलांपासून निर्मिती

BLUE TEA

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतात चहाला अमृत मानले जाते. भारतीयांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते. त्यामुळे भारतीयांच्या जीवनात चहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, जस जसे आजारपण वाढत आहे तसे तसे लोक हेल्थ काॅन्शियन्स झाले असून, त्यांनी आरोग्यवर्धक पेयांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळेच चहामध्ये गुणकारी समजल्या जाणाऱ्या ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी बराबेरच गुळाचा चहा आवडीने प्यायला जातो. अशातच आता व्हिएतनाम, थायलंड, बाली, मलेशिया या देशांत आरोग्यदायक असल्याने आवडीने पिला जाणाऱ्या ब्लू टी ला भारतातही पसंती मिळत आहे. ब्लू टी आरोग्यदायी तर आहेच; पण अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.

ब्लू टी हा ‘अपराजिता’ म्हणजे गोकर्णच्या फुलांपासून तयार केला जातो. त्याला शंखपुष्पी म्हटले जाते. गोकर्ण वेल स्वरूपात येतो. त्याला निळ्या-पांढऱ्या रंगाची फुले येतात. या वेलीला गवारसारख्या शेंगा येतात. त्या वाळवून लावल्या तरी त्याचा वेल उगवतो. त्यातील निळी फुले वाळवून त्यावर प्रक्रिया करून ब्लू टी तयार केला जातो किंवा वाळलेली गोकर्णाची फुले चहासाठी वापरली जातात. ५० ग्रॅम चहा ३५० ते ४०० रुपयांत मिळतो. त्यामध्ये साधारण १०० कप चहा तयार होतो.

कसा घ्यायचा ब्लू टी..

भारतात ब्लू टीबद्दल फारशी जागृती नाही; पण आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्लू टी मधुमेह असल्यास साखर नियंत्रणात ठेवते, वजन कमी हाेते, पचनशक्ती सुधारते, स्मरणशक्ती चांगली राहते. कपभर गरम पाण्यात एक टी बॅग टाकून चहा घेता येतो. गोड हवा असल्यास साखर, मधाचा वापर केला जातो. ब्लू टीचा भारतात वापर करताना उन्हाळ्याच्या दिवसांत ब्लू टी घेताना त्यात दालचिनीचा तुकडा घालावा. चहा उकळताना दालचिनी न टाकता चहा तयार झाल्यानंतर दालचिनीचा छोटा तुकडा कपात टाकून क्षणभर झाकूण ठेवावा मग घ्यावा. पावसाळ्यात ब्लू टी घेताना त्यात आल्याचा तुकडा घालावा तर लहान मुलांना ब्लू टी देताना त्यामध्ये आक्रोड घालावा. मुलांच्या बुध्दिवर्धनासाठी तो फायदेशीर ठरतो.

ब्लू टीमध्ये अॅण्टी अॅाक्सिडंटचे प्रमाण अधिक असते. प्रतिकारक्षमता वाढून पित्ताच्या विकारांसाठी ब्लू टी चांगला असतो. पित्तनाशक, नर्व्हस सिस्टिमसाठी उपयुक्त असून, बुद्धिवर्धक आहे. आयुर्वेदानुसार वातनाशक, पित्तशामक म्हणजे पित्ताचे शमन करणारा आणि कफ वाढू न देणारा ब्लू टी असतो.

– वैद्य विक्रांत जाधव

हेही वाचा :

The post Blue tea : ग्रीन टी, ब्लॅक टी नंतर आता आरोग्यदायी "ब्लू टी', गोकर्णच्या फुलांपासून निर्मिती appeared first on पुढारी.